घरमुंबईगुणपत्रिका, दाखला घेण्यासाठी भवन्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी

गुणपत्रिका, दाखला घेण्यासाठी भवन्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी

Subscribe

चौपाटी येथील भवन्स कॉलेजमध्ये निकालाची प्रत, कॉलेज सोडल्याचा दाखला घेण्यासाठी प्रत्यक्ष बोलवण्यात येत आहे. मात्र कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडला आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून, बहुतांश कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कागदपत्रे ऑनलाईन देण्यात येत आहे. मात्र चौपाटी येथील भवन्स कॉलेजमध्ये निकालाची प्रत, कॉलेज सोडल्याचा दाखला घेण्यासाठी प्रत्यक्ष बोलवण्यात येत आहे. मात्र कॉलेज प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशाचे कॉलेज प्रशासनाकडून तीन तेरा वाजवण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

 

- Advertisement -

ज्युनियर कॉलेजांकडून बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग राखत देण्यात यावे, असे निर्देश राज्य मंडळाकडून दिले आहेत. त्याचप्रमाणे अन्य कॉलेजमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना कॉलेज सोडल्याचा दाखला व कागदपत्रे घेण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉलेजांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रेही ऑनलाईन उपलब्ध करून देण्याबरोबरच द्वितीय व तृतीय वर्षाचे प्रवेश हे ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केले. मात्र भारतीय विद्या भवनचे चौपाटी येथील भवन्स कॉलेजमध्ये १४ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना निकालाची प्रत आणि कॉलेज सोडल्याचा दाखला घेण्यासाठी बोलवण्यात आले आहे. कॉलेजने कागदपत्रे ऑनलाईन देण्याऐवजी प्रत्यक्ष बोलवल्याने विद्यार्थ्यांमध्ये काही अंशी भितीचे वातावरण पसरले होते. भवन्समध्ये आर्ट्स, कॉमर्स व सायन्स अशा तिन्ही शाखेमध्ये बारावीला जवळपास ३५० विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी प्रवेशासाठी कागदपत्रे नेण्यासाठी १४ ऑगस्टपासून कॉलेजमध्ये येत आहेत. परंतु निकालाची प्रत, कॉलेज सोडल्याचा दाखला व अन्य कागदपत्रे घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांचे नियोजन करण्यासाठक्ष प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून, ऑफिसच्या कॉरिडोरमधून चालणे मुश्किल झाले होत. गर्दी वाढल्याने विद्यार्थ्यांना बसवण्यात आलेल्या वर्गामध्येही एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवले होते. एका दिवशी किमान २०० ते २५० विद्यार्थी कॉलेजमध्ये जमा होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोर्‍या वाजत आहे. भारतीय विद्या भवनचे मुख्यालय हाकेच्या अंतरावर असूनही कॉलेज प्रशासनाच्या निष्काळजीपणाकडे संस्थेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल पालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाही एकाचवेळी बोलवून प्रशासनाकडून जीवाशी खेळ करण्यात आला असल्याचा आरोप कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. गुणपत्रिका किंवा अन्य कागदपत्रे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना ठरावीक दिवशी बोलवल्यास गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले असते असेही मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आले. यासदंर्भात कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्रीमंत राठोड यांना वारंवार दूरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- Advertisement -

ऑनलाईन प्रवेशाचाही तीनतेरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर द्वितीय व तृतीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येत आहे. मात्र प्रवेशाची लिंक अनेकदा उघडत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबरच ऑनलाईन शुल्क भरतानाही सर्व्हरची समस्या येत असल्याने पालकांना दोन दोन वेळा शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे पालकांकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवेशाची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत

लॉकडाऊनमुळे अद्यापही वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली नसून, आंतरजिल्हा, आतंरराज्य प्रवासाला सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. असे असताना भवन्स कॉलेजकडून द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रथम १७ ऑगस्ट व त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. २० तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे. मुदतीत प्रवेश न घेतल्यास त्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतील अशी सूचना कॉलेजने जारी केली आहे. त्यामुळे गावाकडे असणारा विद्यार्थी कसा प्रवेश घेणार असा प्रश्न अन्य विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -