घरमुंबईदादर-माहिम समुद्र चौपाटी अस्वच्छच

दादर-माहिम समुद्र चौपाटी अस्वच्छच

Subscribe

कंत्राटदाराची नेमणूक करूनही स्वच्छता नाही

दादर ते माहिम या समुद्र किनारपट्टीवरील स्वच्छतेसाठी चार महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या मान्यतेने नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराने अद्यापही कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे या चौपाटीवर कचर्‍याचे ढिग साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे याचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटल्यानंतर संबंधित कंत्राटदारावर अटी व शर्थीच्या आधारे कडक कारवाई केली जाईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.

वांद्रे-खार येथील चिंबई आणि वारिंगपाडा समुद्र किनार्‍याची दोन वर्षांकरता स्वच्छता राखण्याकरता कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे आला असता शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी तीव्र आक्षेप घेतला. समुद्र चौपाटीवर स्वच्छता राखण्यासाठी स्थायी समितीत आपण प्रस्ताव मंजूर करून देतो. परंतु प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, असा आरोप त्यांनी केला. ऑक्टोबर २०१८ मध्ये दादर-माहिम समुद्र किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार निवडीचा प्रस्ताव मंजूर केला. परंतु या कंत्राटदाराने कार्यादेश मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नसल्याचे वैद्य यांनी सांगितले. माहिम चौपाटी परिसराच्या सुशोभिकरणाचा कामासंदर्भात जी/उत्तर विभागाच्या अधिकार्‍यांसह पाहणी केली असता, चौपाट्यांवर कचर्‍याचे ढिग दिसून आले. याबाबत विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनीही हतबलता दर्शवली आहे. प्रस्ताव मंजूर करूनही कंत्राटदार काम करत नाही. कामांकडे त्यांचे लक्ष नसल्याचा आरोप वैद्य यांनी केला.

- Advertisement -

काँग्रेस नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी चिंबई समुद्रात मलनि:सारण वाहिन्यातील प्रक्रिया न केलेले पाणी सोडले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे मलवाहिन्यातील प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण केले जावे अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी यातील कचरा कुठे टाकला जाणार याची माहिती दिली जावी, अशी विचारणा केली. यावर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी चिंबई व वारिंगपाडा समुद्र किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी देण्यात आलेल्या कंत्राट कामांतील दर हे यापूर्वीच्या कंत्राटापेक्षा कमी असल्याचे सांगितले. तसेच माहिम-दादर चौपाटीसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून जर कामचुकारपणा झाला असेल तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल,असे स्पष्ट केले.

स्थायी समिती शिवाजी देशमुखांना विसरली
स्थायी समितीच्या सभेतील कामकाज हे नियमाला धरून होत नसून महापालिका चिटणीस यांच्या कार्यपध्दतीवर आपला विश्वास नसल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु याच सभेत पुन्हा एकदा घोळ घालण्यात आला. परंतु हा घोळ चिटणीसांच्या चुकीमुळे नव्हता तर खुद्द अध्यक्षांच्या चुकीमुळेच झाला होता. बैठकीच्या शेवटी माजी विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाबाबत शोक प्रस्ताव मांडण्यात येणार होता. परंतु अध्यक्षांनी पटलावरील विषय संपल्यानंतर श्रध्दांजली वाहून शोक प्रस्ताव मांडण्याऐवजी कामकाजच गुंडाळले. त्यामुळे पुन्हा एकदा चिटणीस विभाग विरोधकांच्या रडारवर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -