दहीहंडीचा उत्साह थंड ! रायगडमध्ये दोन गोविंदाचा मृत्यू

Mumbai

‘गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा….’ या गाण्यावर ठेका धरत गोविंदांनी शनिवारी दहीहंडी साजरी केली. पण त्यात दर वर्षीप्रमाणे उत्साह नव्हता. कोल्हापूर आणि सांगलीत महापुरामुळे झालेले अतोनात नुकसान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे शनिवारी झालेले निधन या दु:खद घटनांचे सावट या गोपाळकाल्यावर होते. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील बहुतांश आयोजकांनी यावर्षी दहीहंडी न लावण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईत वरळी, चेंबूर यासारखी ठिकाणे वगळता सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

ठाण्यातील अनेक महत्त्वाच्या आयोजकांनी हंडी लावल्याने ठाण्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठाण्यात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे लावण्यात आलेल्या दहीहंडीत मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी देत आपले वर्चस्व सिद्ध केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हंड्यांची संख्या कमी असताना शनिवारी दुपारी भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन झाल्याची बातमी आली आणि मुंबई ठाण्यातील जवळपास 10 ते 12 हंड्या रद्द झाल्या. त्यामुळे गोविंदा पथकांना अपेक्षित माखनरुपी पारितोषिके मिळवता आली नाहीत. त्यामुळे त्यांची प्रंचड निराशा झाली. तसेच रायगडमधील म्हसळा येथे थरावरून पडून गोविंदाचा मृत्यू झाला. त्यामुळे उत्साहावर दु:खाचे सावट पसरले. तर मुंबईमध्ये सायंकाळपर्यंत 24 गोविंदा जखमी झाले.

मुंबईत 119 गोविंदा जखमी

यंदा मुंबई शहर आणि उपनगरात दहीहंडीचा जल्लोष दरवर्षीसारखा दिसला नसला तरी शनिवारी गोपाळकाल्यात सहभागी झालेल्या गोविंदांनी थरावर थर चढवण्यात कसर सोडली नाही. महिन्याभराच्या सरावानंतर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मैदानात उतरले होते. थरांचा थरार सुरू असताना 61 गोविंदा थरावरून पडून जखमी झाले. यातील ३५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर २६ गोविंदावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षी जखमी गोविंदांचा आकडा १५० पर्यंत पोहोचला होता. यावर्षी जखमी गोविंदाची संख्या कमी झाली होती.

मुंबई शहर व उपनगरातील हॉस्पिटलमध्ये यावर्षी दाखल झालेल्या जखमी गोविंदाची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत 61 गोविंदा जखमी झाले होते. पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 50 जखमी गोविंदांना दाखल करण्यात आले होते. तर राज्य सरकारच्या हॉस्पिटलमध्ये 11 जणांवर उपचार करण्यात आले. नायर हॉस्पिटल ६, केईएम हॉस्पिटल १२, सायन हॉस्पिटल ४, जसलोक हॉस्पिटल १, गोवंडी शताब्दी हॉस्पिटल २, एम.टी. अगरवाल हॉस्पिटल १, राजावाडी हॉस्पिटल १०, कुपर हॉस्पिटल ४, ट्रॉमा केअर हॉस्पिटल ३, व्ही. एन. देसाई हॉस्पिटल १, कांदिवली शताब्दी हॉस्पिटल ६, जे जे ३, सेंट जॉर्ज ५, जी टी हॉस्पिटल ३, केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार केईएममध्ये २0 गोविंदांवर अपघात विभागात उपचार करण्यात आले. या 20 गोविंदांपैकी तिघांना दाखल करून घेण्यात आले. या दाखल गोविंदांमधील विघ्नेष संजय काटकर (१२) याला डोक्याला दुखापत झाली आहे. अनिकेत सुधीर सुतार (२) हा वरळी येथील उदय क्रीडा मंडळाचा गोविंदा आहे. तर सुनील प्रभाकर सावंत (४१) हे लालबाग येथील साई देवस्थान गोविंदा पथकाचे गोविंदा आहेत.