घरमुंबईडेक्कन ओडिसीचे जड झाले ओझे !

डेक्कन ओडिसीचे जड झाले ओझे !

Subscribe

महाराष्ट्रातील पर्यटन वाढीसाठी भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांनी सुरू केलेल्या डेक्कन ओडिसी या आलिशान रेल्वेचे ओझे सध्या जड झाले आहे. पॅलेस ऑन व्हील्सच्या धर्तीवर आधारलेली ही डेक्कन ओडिसी लक्झरी गाडी 2004 साली सुरू करण्यात आली होती. मात्र या गाडीला देशविदेशातील पर्यटकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे ती आर्थिक अडचणीत सापडली. त्यातून बाहेर पडण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनी कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जच्या गळ्यात ओडिसीची घंटा बांधण्यात आली; पण तरीही ती काही वाजायला तयार नाही.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 2014 मध्ये ही आलिशान गाडी पर्यटन क्षेत्रातील नामांकित कंपनी कॉक्स अँड किंग्जला 5 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर दिली. महाराष्ट्र सरकारजवळ अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे डेक्कन ओडिसीचा महागडा प्रकल्प राबविताना अपयश आले होते. सध्या डेक्कन ओडिसीचा आर्थिक भार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला सोसावा लागत आहे.

- Advertisement -

काय आहे डेक्कन ओडिसी?
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुरू होणार्‍या आणि 2400 कि.मी. अंतर कापणार्‍या डेक्कन ओडिसीच्या 8 दिवसांच्या प्रवासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अजिंठा-वेरूळ, जळगाव, नाशिक व परत मुंबई अशा पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे पाहताना पर्यटकांना महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेसा राजेशाही प्रवास अनुभवता यावा यासाठी 2004 मध्ये डेक्कन ओडिसी सुरू करण्यात आली होती. मात्र सध्या डेक्कन ओडिसीची ही आलिशान सफर केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून, गुजरात, दक्षिण, पश्चिम उत्तर भारतातही उपलब्ध आहे.

- Advertisement -

या डेक्कन ओडिसीमध्ये इंटरकॉम, म्युझिक सिस्टिम, उंची फर्निचर, पलंग, वातानुकूलित यंत्रणा असलेले 11 डिलक्स डबे आणि 2 लक्झरी डबे आहेत. आलिशान रेल्वेगाडीपेक्षाही ही गाडी ‘चाकावरचे पंचतारांकित हॉटेल’ वाटावे यादृष्टीने दोन शाही रेस्टॉरंट, बार, सोना, जिम्नॅशियम, कॉन्फरन्स रूम अशा सुविधादेखील आहेत.

प्रति व्यक्ती 3,06,250 इतके भाडे
भारतात महाराजा एक्स्प्रेस, गोल्डन चॅरियटन, रॉयल राजस्थान ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी अशा लक्झरी ट्रेन पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एमटीडीसी व रेल्वे विभागाने संयुक्त विद्यमाने डेक्कन ओडिसी सुरू केली होती. मुख्यत: दोन व्यक्तींसाठी या ट्रेनचे भाडे पूर्वी 5 लाख 83 हजार 406 रुपये इतके होते. मात्र एवढे अफाट भाडे असल्याकारणाने पर्यटकांनी गाडीकडे पाठ फिरवली. नुकतेच रेल्वे मंत्रालय आणि इतर राज्याच्या पर्यटन विभाग आणि शेअर होल्डर मिळून यात 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर हे भाडे 3 लाख 6 हजार 250 रुपये करण्यात आले.

राज्य सरकारला अपयश
महाराष्ट्र सरकारने विविध युक्त्या लढवत जाहिरातबाजी केली. तरीही डेक्कन ओडिसीच्या पर्यटकांची संख्या वाढवता आली नाही. नंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने 2014 मध्ये डेक्कन ओडिसीची सेवा कॉक्स अँड किंग्जच्या स्वाधीन केली. आज पर्यटन क्षेत्रातील जगविख्यात कॉक्स अँड किंग्ज ही कंपनी या ट्रेनचे बुकींग ते ट्रेनचे नियोजन यासारखी सर्व कामे बघते.

कित्येकदा डेक्कन ओडिसीच्या फेर्‍या पर्यटक नसल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत. कॉक्स अँड किंग्ज या कंपनीबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने करार केल्यामुळे डेक्कन ओडिसीचा प्रवास हा नवे आकर्षण ठरेल, असे वाटत होते. मात्र तसे होताना अद्याप दिसलेले नाही.

ओडिसीमधील सुविधा :
इंटरनेट, आयएसडी, एसटीडी, जिम तसेच स्पा ब्यूटी पार्लर, एसीडी/प्लाझ्मा टीव्ही
(दोन लॉज कारमध्ये)
महाराष्ट्र स्प्लेंडर : मुंबई, औरंगाबाद/वेरूळ,ताडोबा, अजिंठा लेणी, नाशिक, कोल्हापूर, गोवा, मुंबई
(8 दिवस/सात रात्री)
महाराष्ट्र वाईल्ड ट्रेल : मुंबई,अजिंठा लेणी, नागपूर, पेंच, ताडोबा, औरंगाबाद, वेरूळ लेणी, मुंबई
(8 दिवस/सात रात्री)

डेक्कन ओडिसीचे वार्षिक उत्पन्न

२०१२- १३      १२. ९५ कोटी

२०१३- १४     ०७.७१ कोटी

२०१४- १५     ०५.२५ कोटी

२०१५- १६     ०५.२६ कोटी

डेक्कन ओडिसीची पर्यटक संख्या
वर्ष           एकूण सीट      बुकिंग सीट     खाली सीट

२०१२-१३      २२४०            १,०५३            ११८७

२०१३-१४      ४८०             २५४                २२६

२०१४-१५      ३०४०           १५८१              १४५९

२०१५-१६      २४८०           १४८८              ९९२

२०१६-१७      १३२६           ८०५                ५२१

डेक्कन ओडिसी ही लक्झरी ट्रेन हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे. महाराष्ट्रातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. मात्र सतत विदेशी पर्यटकांची गळती दिसून येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भारताच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. सध्या तरी हा एक खर्चिक प्रकल्प असला तरी येणार्‍या भविष्यासाठी परदेशी पर्यटक वाढल्यास लक्झरी ट्रेनमुळे देशाच्या पर्यटनाला चालना मिळेल अशी आशा आहे. –ए. टी. नाना पाटील – खासदार आणि संसदीय स्थायी समिती सदस्य

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -