अभिनेत्री दिप्ती नवल यांचे सेक्स्टॉर्शन

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दिप्ती नवल यांचे सेक्स्टॉर्शन करण्यात आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना खंडणीसाठी धमकावले आहे.

Mumbai
Deepti-Naval
अभिनेत्री दीप्ती नवल

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दिप्ती नवल यांचे सेक्स्टॉर्शन करण्यात आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्यांना खंडणीसाठी धमकावले आहे. विशेष म्हणजे खंडणीची ही रक्कम बीटकॉईनच्या रुपात देण्यास सांगितले आहे. खंडणी दिली नाही तर दिप्ती नवल यांचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्याचा इशाराही त्या व्यक्तीने दिला आहे.

दिप्ती नवल यांना 31 जुलै रोजी एक ईमेल आला. या ईमेलद्वारे एका अज्ञात व्यक्तीने त्यांना 5 हजार 600 युएस डॉलर बीटकॉईनच्या स्वरुपात देण्यास सांगितले आहे. हे पैसे जमा करण्यासाठी त्यांना एक लिंकही पाठविण्यात आली आहे. 24 तासांत पैसे जमा झाले नाही, तर त्यांची अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यात येईल, असा धमकीवजा इशारा ईमेलमध्ये देण्यात आला आहे. दिप्ती नवल यांनी मंगळवारी वर्सोवा पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेतली. त्यांनी घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रारही केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धमकी देणार्‍या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

पैसे वसुलीचा नवीन प्रकार

हा खंडणीचाच एक प्रकार असून त्याला सेक्स्टॉर्शन म्हणून ओळखले जाते. त्यात सायबर भामटे हॅकिंगच्या माध्यमातून ईमेल आयडी आणि पासवर्ड देऊन डॉलरमध्ये पैशांची मागणी करतात. पैसे उकाळण्याचा हा नवीन ट्रेंड असून सायबर भामटे एकाच वेळेस पन्नासहून अधिक व्यक्तींना अशा प्रकारे ईमेल पाठवून धमकी देतात. विश्वास बसावा म्हणून ईमेल आणि पासवर्डही पाठविले जाते.

तपास सुरू

तुमचे अश्लील व्हिडीओ आमच्याकडे आहेत. जर पैसे दिले नाही तर ते व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी वसुली करतात. पूर्वी बँक खात्यात खंडणीची रक्कम जमा होत होती, मात्र या खात्यामुळे आरोपी पकडले गेल्याने आता आरोपींनी नवीन योजना सुरु केली आहे. प्रत्यक्ष पैशांऐवजी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे पाठविण्याची धमकी दिली जात आहे. या धमकीची वर्सोवा पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. या कामी पोलिसांना सायबर सेलचे अधिकारी मदत करीत आहेत. हा ईमेल कोणी पाठविला, तो कुठून आला आहे, याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

अमेरिकन नागरीक

दिप्ती नवल या अमेरिकन नागरीक असून त्यांनी न्यूयॉर्क शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये त्यांचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले आहे. 1978 साली शाम बेनगेल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक बंगाली, इंग्रजी आणि हिंदी चित्रपटातून काम करुन आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला होता. सध्या दिप्ती नवल या अंधेरी परिसरात राहतात.