घरमुंबईनिवडणूक आयोगाचा 'तो' टोल फ्री नंबर फक्त जिओसाठीच रिचेबल

निवडणूक आयोगाचा ‘तो’ टोल फ्री नंबर फक्त जिओसाठीच रिचेबल

Subscribe

मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांच्या मदतीसाठी उपलब्ध केलेला टोल फ्री क्रमांक फक्त जीओ नंबर वर उपलब्ध होतोय आणि अन्य मोबाईल कंपनीच्या नंबरवरून मदत उपलब्ध होत नसल्याने मदतरांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार महापालिका प्रशासन आणि जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने विविध उपक्रम राबवून मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. पण असे असतानाही मतदार यादीत आपले नाव आहे का? हे पाहण्यासाठी निवडणूक विभागाच्यावतीने ‘१९५०’ हा मतदार मदत क्रमांक टोल फ्री देण्यात आला आहे. मात्र, हा क्रमांक फक्त जिओ मोबाईलवरूनच रिसिव्ह होत असून अन्य कंपनीच्या मोबाईलवरून डायल केल्यास हा नंबर अस्तित्वात नाही असे सांगितले जात आहे. त्यामुळे मतदार संभ्रमित झाले आहेत. हाच क्रमांक जिओ मोबाईलवरून लावला असता तो लगेच लागतो त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणी तपासणी आणि चौकशी करावी अशी मागणी मतदारांकडून होत आहे.

नागरिकांनी केला प्रश्न उपस्थित

निवडणूक आयोगाने सामान्य मतदारांना मतदान करण्यासाठी माहिती पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मतदारास मिळणारे ओळख पत्र, मतदान यादीतील नाव तपासणी, नाव नोंदणी करणे, मतदान केंद्रावर मतदारांसाठी ठेवण्यात आलेली ईव्हीएम मशीन आणि मतदान केंद्रामध्ये मतदान कसे करावे याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. तसेच मतदान केंद्रावर अंध, अपंग, विकलांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यासाठी स्वयंसेवक प्रथमोउपचार केंद्र विनामूल्य वाहतूक व्यवस्थाबाबत सुद्धा माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. मतदारांना मदत करण्याच्या दृष्टीने ‘१९५०’ हा टोल फ्री क्रमांक माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आला आहे. मात्र, हा क्रमांक उपलब्ध नसल्याचे आयडिया, वोडाफोन, एअरटेल, बीएसएनएल आदी मोबाईल कंपनीच्या सिमवरून सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी निवडणूक कार्यालयात धाव घेऊन नायब तहसीलदार संदीप आवारी यांच्या जिओच्या मोबाईलवरून संपर्क केला असता तो क्रमांक उपलब्ध झाला. मात्र, त्यांच्या कडील अन्य कंपनीच्या मोबाईलवरून ‘१९५०’ क्रमांक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे नायब तहसिलदार आवारी यांनीही आश्चर्य व्यक्त केले. तसेच या प्रकारावरून निवडणूक आयोगाने जिओ कंपनीशी करार केला आहे का? असा प्रश्न मतदारांकडून विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -