घरमुंबई'प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाका' - रामदास कामत

‘प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाका’ – रामदास कामत

Subscribe
उद्यापासून राज्यात लागू होणाऱ्या ‘प्लॅस्टिकबंदी’ची सध्या देशभरात चर्चा आहे. सामान्य माणसापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वच स्तरांतून याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये रामदास कदम यांनी प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ”राज्यातील विविध शहरातून किती प्लास्टिक जमा होते, त्याचे रिसायकलिंग केले जाते का ? याचा अहवाल आठ दिवसात द्यावा”, असंही कदम म्हणाले.

रामदास कदम यांचे आदेश

अधिकाऱ्यांशी चर्चा करतेवेळी कदम म्हणाले, ”पर्यटन स्थळं, तीर्थस्थळं याठिकाणी तसंच यात्रा, उत्सवांच्यावेळी भाविकांना दिल्या जाणाऱ्या कापडी पिशव्या या कापडी नसून त्या प्लास्टिकच्याच असतात. या पिशव्या उत्पादन करणारे, साठवणूक करणारे व दुकानदार यांच्यावर तातडीने कारवाई करुन साठा जप्त करावा. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.” तसंच ”विनापरवाना प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या, कारखाने आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन अशा कंपन्या सील करा. राज्यात ठिकठिकाणी शहरांमध्ये प्लास्टिक उत्पादनाची साठवणूक करण्यासाठी गोडाऊन आहेत. ती शोधून सील करा. तिथला माल जप्त करा”, असे आदेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, ”उद्यापासून लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक व थर्माकोल बंदीला नागरीकांनी सहकार्य करावे”, असे आवाहनही रामदास कदम यांनी यावेळी केले.

आदित्य ठाकरेंचाही सल्ला

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे याविषयी बोलताना म्हणाले, ”प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळण्यासाठी गणेश  मंडळाची बैठक घ्यावी. मंडळांना विश्वासात घेऊन प्लास्टिक आणि थर्माकोल यांच्या परिणामांची माहिती द्यावी. तसेच शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांनी आपल्या घरातील प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिक कलेक्शन सेंटरवर आणून द्याव्यात.” यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ.पी.अनबलगन तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -