बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी भाजप नगरसेविका नीला सोन्स यांच्याविरोधात गुन्हा दाखल

File case against BJP corporator Neela Sons in fake caste certificate case

भाजपच्या मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेविका नीला सोन्स यांच्याविरोधात जातीचा बोगस दाखला बनवल्याप्रकरणी मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्स यांच्या जातीच्या दाखल्याविरोधात खुद्द माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी तक्रार केली होती. त्यानंतर १० ऑगस्ट २०२० ला नगरसेविका सोन्स यांचे जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचे मुंबई उपनगर जात वैधता प्रमाणपत्र समितीने जाहीर केले होते. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते.

जिल्हा दक्षता समिती निरीक्षक तानाजी भगत यांच्या तक्रारीवरून सोन्स यांच्याविरोधात मुंबईतील खेरवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र अनुसूचित जादी, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग कायदा २००० च्या कलम ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सोन्स भाजपचे मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या निकटवर्तीय मानल्या जायच्या. मात्र, सोन्स यांनी २६ फेब्रुवारी २० रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात मेहता यांच्याविरोधात लैंगिक शोषण, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भाजपमधूनही सोन्स यांना तीव्र विरोध सुरु झाला होता. बुधवारी सोन्स यांच्याविरोधात शाळेचा बेकायदा कब्जा केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.