घरमुंबईडोळ्या देखत आगीनं गिळंकृत केला संसार

डोळ्या देखत आगीनं गिळंकृत केला संसार

Subscribe

मंगळवारी वांद्र्यातील नर्गिस दत्त झोपडपट्टीला आग लागली त्यात शेकडो जण बेघर झाले. आता आव्हान आहे ते संसार उभारण्याचं आणि नव्यानं आयुष्य सावरण्याचं.

आगीनं सारं भस्मसात केलं. कपडालत्ता, संसाराचं सारं सामान आगीनं गिळंकृत केलं. पण, केवळ नशीब बलवत्तर म्हणून कुटुंबातील सारेजण सुखरूप वाचले. समाधान होतं ते मुलांचा जीव वाचल्याचा. आता संघर्ष सुरू झालाय तो संसार उभारण्याचा. त्याच राखेतून उभे राहण्याचा. ही सारी कर्मकहाणी आहे २८ वर्षीय शेहजादी रहिम यांची. वांद्र्यातील लालमाती परिसरात मंगळवारी लागलेल्या आगीनं नर्गिस दत्त झोपडपट्टीतील ८० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हजारो शेकडो संसार रस्त्यावर आले आणि ६ जण किरकोळ जखमी झाले. सिलिंडरच्या स्फोटानं या आगीत भर पडली. पण, आगीचं नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

राखेतून उभं राहण्याचं आव्हान

या आगातील एक घर होतं ते २८ वर्षीय शेहजादी रहिम यांचं. मागील ११ वर्षांपासून शेहजादी त्यांच्या परिवारासह नर्गिस दत्तमध्ये राहत आहेत. पण, मंगळवारी अचानक लागलेल्या आगीत पूर्ण झोपडपट्टी जळून राख झाली. आग लागण्यापूर्वी १५ मिनिटं कामानिमित्त शेहजादी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्यामागे त्यांची मुलं सैफउद्दीन आणि हुमायरा ही दोघं घरीच होती. सैफउद्दीन हा २ वर्षांचा तर, हुमायरा ही ९ वर्षांची मुलगी होती. पण, जेव्हा त्या परतल्या तोपर्यंत त्यांचं घर पूर्णपणे जळालं होतं. त्यात त्यांची मुलं देखील अडकली होती. तोवर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या दोन्ही मुलांना सुखरुप बाहेर काढल्याचं शेहजादी सांगतात.

- Advertisement -

वाचा – वांद्रे आग: नर्गिस दत्त नगरात धुराचे लोट

या आगीनं सारं भस्मात केलं. पण, समाधान होतं ते दोन्ही मुलं सुखरूप असल्याचं. घर पुन्हा बांधता येईल. पण, मुलं वाचली हेच समाधान होतं. हे सारं सांगताना शेहजादी यांचं डोळे अश्रुनी पाणावले. या परिसरात वर्षाला किमान ४ ते ५ वेळा आग लागते. तर दुसरीकडे फातिमा शेख यांची परिस्थिती देखील काही वेगळी नाही.

फातिमा शेख यांची कर्मकहाणी

फातिमा शेख यांची कर्मकहाणी देखील काही वेगळी नाही. फातिमा देखील मागील १८ वर्षापासून मुंबईमध्ये राहत आहेत.१८ वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच अशी परिस्थिती ओढावली असल्याचं फातिमा सांगतात. फातिमा यांचं ४ जणांचं कुटुंब आहे. फातिमा यांचं संपूर्ण घर जळून गेलं. त्यामुळे कपडे काय घालायचे ? संसार कसा काय उभा करायचा? असा प्रश्न आता फातिमा आणि त्यांच्या कुटुंबियांना पडला आहे.

- Advertisement -

“इथे सतत आग लागते पण, आमच्या घराला पहिल्यांदाच आग लागली. यात आमचं संपूर्ण सामान जळालं. शिवाय, काही सामान चोरीला देखील गेलं. मोठ्या मुलाला पोलिओचा त्रास आहे. त्याचा उजव्या हाताला आणि पायाला अपंगत्व आहे. त्यामुळे तो घरीच होता. आग लागली तेव्हा तो ही लगेचच तिथून पळाला. त्यामुळे कोणाच्या जीवावर बेतलं नाही. माझी दोन्ही मुलं आणि पती सुखरुप आहेत.” असा थरारक अनुभव फातिमा यांनी माय महानगरला सांगितला.

वाचा – वांद्रे येथे झोपडपट्टीला आग; ८० झोपड्या खाक, ६ जखमी

वांद्र्यातील आगींचा इतिहास

वांद्र्याच्या लालमाती परिसरातील नर्गिस दत्तनगरमध्ये आतापर्यंत अनेकदा आगी लागल्या आहेत. नर्गिस दत्त झोपडपट्टीला २००४ साली मोठी आग लागली होती. या आगीमध्ये येथील सर्वच झोपड्या जळाल्या होत्या. मागच्या काही वर्षांत या ठिकाणी ७ ते ८ वेळा आग लागल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली. त्यामुळे आता लागलेली आग नेमकी कशामुळे लागली? आगीचं नेमकं कारण काय ? आग लागली की लावली गेली ? हे सर्व चौकशीद्वारे तपासण्यात येईल असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं आहे.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -