घरमुंबई...तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती

…तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती

Subscribe

ओएनजीसी नाफ्ता गळती

तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाच्या उरण येथील एलपीजी प्रकल्पातील एपीयू युनिटमध्ये बुधवारी लागलेल्या भीषण आगीने उरणकरांच्या भीतीने थरकाप उडवला असताना ही गंभीर घटना घडत असताना प्रचंड पाऊस पडला नसता तर आगीने अधिकच रौद्र रूप धारण करून परिस्थिती अधिकच भयावह करून सोडली असती, अशी माहिती मिळते. पावसामुळे नाल्यांचे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळाल्याने समुद्रात आगीचे तांडव झाले. मात्र पावसामुळे नाल्यातील वाहून गेलेल्या नाप्थ्याने १५ मीटर उंचीच्या ज्वाला निर्माण झाल्या. पाण्याअभावी नाप्था नाल्यात साचून रहिला असता तर आगीची तीव्रता वाढली असती आणि नको त्या आपत्तीला स्थानिकांना तोंड द्यावे लागले असते.

बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ओएनजीसीच्या एलपीजी प्रकल्पातील डी.एम.प्लान्टमधील नाप्थ्याचा तलाव ओसंडून वाहू लागला. नाप्थ्याचा वास येत असल्याची माहिती प्रकल्पाशेजारील नागावमधल्या काही नागरिकांनी ओएनजीसीच्या नियंत्रण कक्षाला दिली. मात्र उशिरापर्यंत याकडे नियंत्रण कक्षाचं लक्ष गेलं नाही. अखेर ही माहिती प्रकल्पातील अग्निशमन यंत्रणेला मिळाली आणि डी.एम.प्लान्टला नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन विभागाची यूटीलिटी वाहन तसंच अग्नीबंब रवाना झाला. ज्या नाल्यातून तलावातील नाप्था वाहून जात होता त्याच नाल्याच्या शेजारी ही वाहने उभी असल्याने सायलेन्सरच्या स्पार्कने पावणेसात वाजण्याच्या सुमारास नाप्थ्याशी संपर्क होऊन आग भडकली. या आगीने नाप्थ्याच्या तलावाला घेरलं आणि यात अग्नीबंबसह युटीलिटी विभागातील इंडिकाला वेढलं. अग्नीबंबावरील केंद्रिय सुरक्षा दलाचे जवान अनुक्रमे एस. पी.कुशवाह, एन. ए. नायका आणि महेंद्रकुमार फिरंगीप्रसाद पासवान यांचा हकनाक जीव गेला. याशिवाय युटीलिटी वाहनातील ओएनजीसीचे निवासी सुपरवायझर चलापिल्ला नरसिंहग राव हे ही मृत्यूमुखी पडले.

- Advertisement -

ही घटना घडली तेव्हा उरण परिसरात प्रचंड पाऊस होत होता. यामुळे प्रकल्पाजवळील नागाव गावातील नाले तुडूंब भरून वाहत होते. तलावातील नाप्था या नाल्यांतून अरबी समुद्राकडे रवाना झाला. वाहून जाणार्‍या नाप्थ्याला लागलेल्या आगीने सुमारे १५ मीटर उंचीच्या ज्वाला निर्माण होऊन आसपासच्या घरांना त्याची झळ पाहोचली. हा नाप्था वाहत्या पाण्यामुळे समुद्राकडे रवाना होऊनही आगीची झळ मोठी होती. पाऊस नसता तर नाप्था नाल्यात जमा राहिला असता आणि आगीने त्याला वेढले असते तर भयंकर परिस्थिती ओढावली असती. आगीची ही घटना सकाळी पावणेसात वाजता घडली. रात्रीच्या वेळी हा प्रसंग उद्भवला असता तर त्याचे गंभीर परिणाम नागावमधील नागरिकांना सोसावे लागले असते, असं एकूण चित्र या परिसराचं होतं.

बेफिकीर अधिकारी
मंगळवारी ओएनजीसीच्या नाप्था टाकीतून वाहून गेलेल्या नाप्थावर नियंत्रण ठेवणार्‍या संबंधितांविरोधी तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. नियंत्रण कक्षामधील कामगार हे नवखे असल्यानेच अशा घटना घडतात. नियंत्रण कक्षावर निगराणी ठेवणारे अधिकारी अनुभवी असायला हवेत. अननुभवी कामगारांकडे जबाबदारी दिल्यानेच ही घटना घडल्याचा आक्षेप घेतला जात आहे.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -