आज सोनं, चांदीचा भाव पुन्हा वधारला !

gold price

सोने आणि चांदी यांच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे. पण आज मात्र सोन्याचा भाव पुन्हा १२४ रूपयांनी वधारला आहे. मंगळवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १२४ रूपयांची वाढ झाली. त्यामुळे आजचा सोन्याचा दर हा प्रति १० ग्रॅमला ५० हजार ३७६ रूपयांवर पोहचला. रूपयाला आलेला चांगला भाव हेच मुख्यत्वेकरून सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण आहे.

गेल्या २ महिन्यांमध्ये रूपयाला आलेल्या तेजीमुळेच सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली आहे. येणाऱ्या काळातही सोन्याच्या किमतीत अशाच स्वरूपाचा चढउतार पहायला मिळू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 0.27 टक्क्यांनी वाढून 50,970 रुपयांवर गेले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरच्या सोन्याचे वायदेचे भाव 177 रुपयांनी म्हणजेच 0.27 टक्क्यांनी वाढले होते. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.20 टक्क्यांनी घसरून 1,925 डॉलर प्रति औंस झाले.

मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत कमी होऊन 52 हजारांच्या खाली आली होती. या दरम्यान चांदीचे दर 875 रुपयांनी उतरले होते. मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 52 हजार 122 रुपये होते. तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 1919 डॉलर होता तर चांदीची किंमत 24.89 डॉलर प्रति औंस होती.

या गोष्टींचा होऊ शकतो परिणाम

अमेरिकन स्टिम्यूलस पॅकेजबाबत अनिश्चितता जारी आहे. त्यामुळे सध्या व्यापाऱ्यांची नजर ब्रिटनच्या व्यापार करारावर आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपिय संघ व्यापार कराराचा आराखडा तयार करण्यासाठी गुरुवारपर्यंत कालावधी निश्चित केला आहे. सोन्याला सुरक्षित आणि बचावात्मक स्वरूपात पाहिले जाते. अमेरिकेत निवडणुकीचा निकाल, अमेरिकन डॉलर आणि कोविड लशीच्या माध्यमातून सोन्याच्या किंमतीला यापुढच्या काळात दिशा मिळेल.