घरमुंबईकेबल ऑपरेटर्सचा व्यवसाय बंद करण्याचा सरकारचा डाव

केबल ऑपरेटर्सचा व्यवसाय बंद करण्याचा सरकारचा डाव

Subscribe

ट्रायच्या नव्या प्रणालीमुळे येणार्‍या काळात केबल ऑपरेटर्सचा व्यवसाय बंद करण्याची सरकारची ही तयारी असल्याचा आरोप करीत ठाण्यातील जिल्हा केबल सेनेच्या वतीने 24 डिसेंबर रोजी ट्रायच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. या नव्या नियमांमुळे केबल व्यवसायाचे कंबरडे मोडण्याची भीती केबल ऑपरेटरकडून व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून टीव्ही केबल सेवेसाठी महिन्याला स्थिर आकारभाडे म्हणून 130 रुपये मोजावे लागणार आहे. ज्यामध्ये 100 चॅनल्सचा समावेश आहे. मात्र त्यावरील प्रत्येक चॅनलसाठी 50 पैशांपासून ते 19 रुपये आणि त्यावर सेवाकर असा अतिरिक्त बोजा ग्राहकांवर पडणार आहे. या शिवाय पसंतीच्या चॅनल्सकरिता दरमहा किमान 500 रुपये मोजावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सद्यस्थितीत केबल ऑपरेटर केवळ 250 ते 450 रुपयांमध्ये 400हून अधिक चॅनलची सेवा ग्राहकांना देत आहे.

- Advertisement -

फ्री टू एअर तसेच फारसे लोकप्रिय नसलेल्या चॅनल्सची संख्या अधिक असल्यामुळे त्या चॅनलसाठी पॅकेज घ्यावे लागणार आहे. या पॅकेजचा दर चॅनलनुसार असून त्यावर 18 टक्के जीएसटी म्हणजे 23.40 रुपये असे एकूण 153.40 रुपये मोजावे लागणार. याशिवाय केबल ऑपरेटरला या सर्व गोष्टींची नोंद ठेवावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर त्यांना ग्राहकांकडून पैसे गोळा करताना त्याचा हिशोब ठेवण्यासाठी एक व्यक्ती ठेवावी लागणार आहे. या नवीन प्रणालीमुळे ठाणे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना याचा फटका बसणार आहे. सध्या देशात बेरोजगारीचा प्रश्न वाढत असताना सरकार आहे ते रोजगार बंद करून त्यात आणखीन वाढ करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बेसिक रेटमध्ये दाखविले जाणारे चॅनल म्हणजे ज्यांचा ग्राहकांशी कधी संबंधच येत नाही. त्यामुळे साहजिकच आवडत्या चॅनलसाठी पैसे मोजण्याशिवाय पर्याच नाही. ही ग्राहकांची शुद्ध फसवणूक आहे. या मागे केवळ केबल ऑपरेटरचा व्यवसाय बंद करणे आणि ग्राहकांना लुटणे हाच उद्देश असल्याचे मत ठाणेकर व्यक्त करीत आहेत.

हा निर्णय ग्राहक व केबलचालक या दोहोंसाठीही मारक आहे. या नियमावलीमध्ये केबल ऑपरेटर जो ग्राहकांना मागील 20 ते 25 वर्षापासून सेवा पुरवित आहे. त्यांच्याबाबतीत विचारच केला गेला नाही. कारण ही केबल टीव्ही सेवा पुरविण्यासाठी प्रचंड प्रमाणात नेटवर्क इफ्रावर खर्च होतो. ग्राहकांचे कॉल घेण्यासाठी एक छोटे कॉल सेंटर चालवावे लागते. ट्रायच्या नवीन दरप्रणालीमुळे शेकडो केबल ऑपरेटर, त्याचे कर्मचारी व त्याचे कुटुंब या सर्वांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. केबल हा एक स्वयंरोजगार आहे. कोणत्याही शासकीय किंवा वित्तीय संस्थेची मदत नसतानाही मागील 25 वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे. तोच बंद करण्याचा ट्रायच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे.
– मंगेश ग.वाळंज, अध्यक्ष, ठाणे जिल्हा केबल सेना

- Advertisement -

हा एक प्रचंड मोठा स्वयंरोजगार आहे. यावर अनेक कुटुंबांची उपजीविका चालते. शिवसेना यांच्यामागे कायम उभी असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी माननीय पालकमंत्र्यांसमवेत आम्ही या प्रश्नावर सर्वसमावेशक चर्चा करून समेट घडवून आणू. जेणेकरून केबल ऑपरेटरच्या व्यवसायावर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही. त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन आम्ही तो सोडवू.
– प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना, ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -