घरमुंबईचारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या

चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या

Subscribe

कांदिवलीमध्ये मोहम्मद रकीब अब्दुल हाफिज खान याने आपल्या पत्नीचा विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशयातून गळा आवळून खून केलाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची घटना रविवारी १४ एप्रिलला रात्री उशिरा कांदिवली परिसरात घडली आहे. या हत्येनंतर पतीनेच मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षेला ही माहिती देऊन या हत्येची कबुली दिली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी पती मोहम्मद रकीब अब्दुल हाफिज खान याला अटक केली असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत महिलेचे नाव अजमातूनिसाओ मोहम्मद रकिब खान असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवड्यातील पतीने पत्नीची हत्या केल्याची ही तिसरी घटना असून तिन्ही घटनेत आरोपी पतीने पोलिसांपुढे हत्येनंतर आत्मसमर्पण केले होते.

आता पर्यंतची तिसरी घटना

रविवारी १४ एप्रिलला रात्री उशिरा दिड वाजता कांदिवलीतील गांधीनगर, खान गल्लीतील युवाशक्ती चाळीत अशीच एक घटना घडली. याच चाळीत मोहम्मद रकिब हा त्याची पत्नी अजमातूनिसाओ आणि मुलांसोबत राहत होता. त्याचे त्याच परिसरात भंगार विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला अजमातूनिसाओचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. रविवारी रात्री एक वाजता मोहम्मद रकिब हा घरी आला होता. यावेळी त्याचे पत्नीसोबत याच कारणावरुन भांडण झाले होते. याच भांडणानंतर त्याने पत्नी अजमातूनिसाओ हिला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याने तिची गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर त्याने मोबाईलवरुन मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करुन त्याने त्याच्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली. ही माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना अजमातूनिसाओचा मृतदेह तिच्याच घरात सापडला. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी विजय राणे यांच्या तक्रारीवरुन कांदिवली पोलिसांनी मोहम्मद रकिब खान याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

या प्रकरणानंतर कुटुंबात भितीचे वातावरण

दरम्यान, मोहम्मद रकिब याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गेल्याच आठवड्यात अंधेरीतील एमआयडीसी परिसरात दोन घटनेत पतीने पत्नीची हत्या केली होती. या दोन्ही घटना ताज्या असतानाच रविवारी मध्यरात्री तिसर्‍या घटनेत पतीने त्याच्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद रकिबला दोन मुली आणि चार मुले असून हत्येच्या वेळेस सहाही मुले घरातच होती. या घटनेनंतर त्यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -