घरमुंबईपरीक्षा संचालकपदी कोणाची लागणार वर्णी

परीक्षा संचालकपदी कोणाची लागणार वर्णी

Subscribe

मुलाखती पूर्ण, अंतिम घोषणेकडे सार्‍यांचे लक्ष, पूर्णवेळ संचालक लवकरच मिळण्याची शक्यता

गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या संचालक पदी लवकरच पूर्ण संचालकांची निवड होण्याची चिन्हे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठात दिसू लागले आहेत. विद्यापीठात वाढत असलेली विद्यार्थी संख्या आणि परीक्षा विभागावरील ताण लक्षात घेता या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पदासाठी मुंबईसह राज्यातील एकूण २४ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी अंतिम १८ जणांची मुलाखत नुकतीच विद्यापीठातील कलिना कॅम्पस येथे पार पडल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे सध्या प्रभारी संचालक म्हणून काम पाहणारे डॉ. अर्जुन घाटुळे हे पुढील आठवड्यात माघारी जाणार असल्याने तोपर्यंत नवीन संचालकपदाची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या माजी परीक्षा संचालक दिनेश भोंडे यांनी मुदत संपल्यानंतर हे पद रिक्त आहे. या पदी कायमस्वरुपी संचालकांची नेमणूक व्हावी यासाठी दोन वेळा मुलाखती देखील घेण्यात आल्या होत्या. परंतु योग्य उमेदवार न मिळल्याने हा प्रश्न अद्याप संपलेला नाही. त्यानंतर माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या कारकिर्दीत ऑनलाइन असेसमेंटमुळे झालेल्या निकाल गोंधळामुळे परीक्षा विभागाला टीकेला सामोरे जावे लागले. त्यातच दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रियेत होणार्‍या नानाविध गोंधळामुळे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक पदी प्रभारी धुरा नाशिक येथील मुक्त विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता नवनियुक्त कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी प्रभारी पदांवर पूर्णवेळ अधिकार्‍यांची नेमणूक करण्याच्या हालचालींचा वेग वाढविला होता. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षा व मूल्यमापन संचालक आणि कुलसचिव या पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र समोर आले आहे. या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या अंतिम उमेदवारांची मुलाखत नुकतीच विद्यापीठात पार पडली आहे. या अंतिम उमेदवारांपैकी एका नावाची घोषणा पुढील आठवड्यात होणार असून परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

विद्यापीठाने दिलेल्या जाहिरातीनुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी एकूण २४ जणांनी अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर अंतिम १८ जणांची मुलाखत नुकतीच विद्यापीठाने नेमलेल्या समितीने घेतलेली आहे. तर कुलसचिव पदांसाठी देखील यंदा ३२ जणांनी अर्ज केले होते. या अर्जांपैकी एकूण २४ जणांची निवड अंतिम मुलाखतीसाठी करण्यात आली होती. या पदासाठी देखील मुलाखती पूर्ण झालेल्या असून अंतिम घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठातील अनेक आजी-माजी कर्मचार्‍यांनी देखील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदासाठी अर्ज केल्याची माहिती हाती आलेली आहे. परंतु युजीसीच्या नियमानुसार यंदा पाच वर्षांच्या शिकवणीची अट ठेवण्यात आलेली आहे. या अटीमुळे अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -