घरमुंबईमाहुलवासीयांंच्या संतापामुळे मनोज कोटक यांचे पलायन

माहुलवासीयांंच्या संतापामुळे मनोज कोटक यांचे पलायन

Subscribe

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून तानसा जलवाहिनी लगतच्या रहिवाशांना माहुलला हलवल्यास अन्य प्रकल्पांमधील घरांचे टाळे तोडून नागरिकांना घरे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर भाजपकडून दुर्लक्ष केल्याबाबत बुधवारी माहुलवासीयांनी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना जाब विचारण्यासाठी घेराव घातला. यावेळी कोटक यांनी राजकारण करू नका असे उत्तर देत माहुलवासीयांच्या प्रश्नाला सामोरे जाण्याचे टाळत तेथून पळ काढला.

विद्याविहारमधील तानसा जलवाहिनीलगतच्या नागरिकांना माहुलला हलवण्यास 2014 लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विरोध केला होता. खासदार किरीट सोमय्या यांनी माहुल राहण्यास अयोग्य असल्याने नागरिकांना तेथे हलवल्यास जोरदार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच अन्य प्रकल्पातील बंद घरांचे टाळे तोडून नागरिकांना राहायला देईल, असे आश्वासन दिले होते. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा माहुलवासीयांकडे ढूंकूनही पाहिले नाही.

- Advertisement -

राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असताना आमचा प्रश्न सोडवणे भाजपला अवघड नव्हते. असे असतानाही भाजपने आमच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बुधवारी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारफेरी त्यांना जाब विचारण्यासाठी 10 ते 15 माहुलमधील नागरिक गेले होते. तुम्ही कोणत्या आधारावर आमच्याकडे मत मागत आहात, असा प्रश्न माहुलवासीयांनी केला असता प्रचारफेरीत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी माहुलवासीयांना धक्काबुक्की करत त्यांना उद्धटपणे वागणूक दिली. तर कोटक यांनी तुम्ही याचे राजकारण करू नका असे उत्तर दिल्याचे माहुलमधील रहिवासी रेखा घाडगे यांनी सांगितले.

कोटक यांनी दिलेल्या उत्तरावर संतप्त झालेल्या माहुलवासीयांनी आमच्या आयुष्याचे, घराचे राजकारण आम्ही नव्हे तर तुम्ही केले आहे, असे उत्तर दिले. माहुलवासीय आक्रमक झाल्याचे पाहून कोटक यांनी तेथून पळ काढल्याचे घाडगे यांनी सांगितले. सत्तेत येणार्‍यापूर्वी किरीट सोमय्या आमच्यासाठी आंदोलन करायला व घराचे टाळे तोडायला तयार होते. पण सत्तेत आल्यावर त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कोटक हे आमच्याकडे कशाच्या आधारावर मत मागायला येत आहेत याचाच जाब आम्ही त्यांना विचारायला गेल्याचे रेखा घाडगे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -