घरमुंबईसरकार भाजपचेच येणार

सरकार भाजपचेच येणार

Subscribe

सत्तास्थापनेसाठी घोडेबाजार करणार नाही; फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास, युती अद्याप तुटली नसल्याचा निर्वाळा

राज्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष अद्याप काही संपलेला नाही. ज्या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे, असा कोणताही फॉर्म्युला आम्ही मान्य केला नव्हता. माझ्या समोर याबाबत निर्णय झालेला नव्हता. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहीत नव्हते. मी तसे अमित शहा आणि नितीन गडकरी यांना विचारले, मात्र त्यांनीही असे काहीही ठरलेले नाही, असे सांगितले, असे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. सत्ता स्थापनेची चर्चा ही शिवसेनेकडून थांबवण्यात आली असून उद्धव ठाकरे यांना आपण फोन केला असताना उद्धव ठाकरे यांनी फोन घेतले नाहीत, असा आरोप करताना फडणवीस यांनी पुढचे सरकार हे आमचेच येईल, असा ठाम विश्वास यावेळी बोलून दाखवला.

दरम्यान सत्ता स्थापन करताना कोणत्याही प्रकारचा घोडे बाजार आपण करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावरील पत्रकार परिषदेत त्यांनी आमच्या शीर्षस्थ् नेत्यांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही असा इशारही शिवसेनेला दिला. आपण राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी आपल्याला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची सूचना केल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आयोजित सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्य्क्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते आणि मंत्री उपस्थित होते. दरम्यान, आपण राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी आपल्याला कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची सूचना केली असून ती आपण मान्य केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षवरून त्यांनी शिवसेनेला धारेवर धरले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषेदेत उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य ऐकून धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही महायुती म्हणून विधानसभा निवडणूक लढलो एकत्र मते मागितली. असे असताना निवडणुकीच्या पहिल्याच पत्रकार परिषेदेत उद्धव ठाकरे यांनी आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य केल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. तर या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. मात्र शिवसेनेने आमच्याशी चर्चाच केली नाही. मित्रपक्षाशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याशी शिवसेनेने चर्चा केली. मात्र त्यांना आमच्याशी चर्चा करावीशी वाटली नाही, असे सांगत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणले, गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. पण निकालानंतर मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केले, पण त्यांनी ते उचलले नाही. चर्चेची दारं आमच्याकडूून खुली होती. भाजपासोबत चर्चाच करायची नाही हे धोरण शिवसेनेचे आहे, आमचे नाही, असे सांगत त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला सत्ता संघर्षचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला.

- Advertisement -

संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीय आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून कोणतंही वक्तव्य केलं नाही. कधीही करणार नाही, असं सांगतानाच गेल्या पाच वर्षात शिवसेनेने मात्र आमचे सर्वात मोठे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. त्यांनी मुखपत्रातूनही टीका केली आणि जाहीरपणेही टीका केली. केंद्रात मोदींसोबत राहायचं आणि इकडे टीका करायची हे योग्य नव्हतं. काँग्रेसनेही कधी त्यांच्यावर एवढ्या थराला जाऊन टीका केली नव्हती. विरोधकांनी जेवढे घातले नाही तेवढे घाव त्यांनी घातले. असं असतानाही आम्ही आमची मर्यादा कधीच ओलांडली नाही, असे जाहीर करताना त्यांनी शिवसेनेवर हल्लबोल चढविला. मोदींवर टीका करणार नसल्याचं शिवसेनेने आम्हाला सांगितलं होतं. व्यक्तीऐवजी धोरणांवर टीका करणार असल्याचं ते म्हणाले होते. पण तरीही त्यांची टीका सुरूच होती, असं सांगतानाच आम्हालाही उत्तरं देता येतात. पण आम्ही देणार नाही. आम्ही सभ्य आहोत.

आमचा तो स्वभाव नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींवर टीका सुरूच असेल तर सरकार तरी कशाला चालवायची असा प्रश्नही आमच्यासमोर होता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तत्पूर्वी चार वर्षे दुष्काळाची, हे वर्ष अतिवृष्टीचं ठरले तरीही शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम राज्य सरकारने केले. महाराष्ट्रातली सर्वात मोठी योजना ती यशस्वीपणे राबवण्याची संधी आम्हाला मिळाली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाायाभूत सुविधांचे काम या कार्यकाळात करता आले याचे समाधान वाटते आहे, असे स्पष्ट करीत त्यांनी आपली पाठ थोपटली. तर निवडणुकीत आम्ही लढलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा लोकांनी आम्हाला दिल्या. जे काम आम्ही केलं त्या कामाची पावती महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिली. ज्या प्रामाणिकपणे सरकार चाललं त्या विश्वासातून जनतेने आम्हाला पुन्हा कौल दिला. अपेक्षेपेक्षा काही जागा कमी आल्या असतील. पण सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.

अन्यथा माफी मागा
सरकार स्थापन करण्यासाठी फोडाफोडीचे राजकारण आम्ही कधीही केलेले नाही. याबाबत जर कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत, असे आव्हानच फडणवीस यांनी दिले. आणि पुरावे नसतील तर जाहीर माफी मागा असे आव्हान देखील यावेळी त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -