घरमुंबईम्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडतीला मुदतवाढ?

म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडतीला मुदतवाढ?

Subscribe

 मुदतवाढीवर आज निर्णय अपेक्षित

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता आता निवडणुकीचे कारण पुढे करत या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील २१७ घरांसाठी आठवड्याभराच्या कालावधीत अवघे १५ हजार अर्ज दाखल झाले आहेत. पवई आणि चेंबूर सहकार नगर येथील सदनिका म्हाडाच्या मुंबई मंडळाने यंदाच्या सोडत प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिली आहेत. लवकरच याबाबतचा निर्णय हा जाहीर करण्यात येईल असे म्हाडा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या सोडत प्रक्रियेवर मुदतवाढीवर मंगळवारी होणार्‍या बैठकीत स्पष्टता येईल, अशी प्रतिक्रिया म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.

म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेत निवडणूक आचारसंहितेचा अडसर येणार नाही, असे स्पष्टीकरण म्हाडातील अधिकार्‍यांकडून तसेच अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडून याआधी देण्यात आले होते. पण आता म्हाडा प्रशासनाने या प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली आहे. उपाध्यक्षांकडे मुदतवाढीबाबतची फाईल दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या मंजुरीनंतरच मुदतवाढीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. ही मुदतवाढ किती असेल याबाबतचा खुलासाही लवकरच म्हाडाकडून होणार असल्याचे कळते. सध्याच्या मुंबई मंडळाच्या वेळापत्रकाप्रमाणे घरांसाठीचा अर्ज दाखल करणे आणि अनामत रक्कम भरणे यासाठी १३ एप्रिलची डेडलाईन आहे. तर म्हाडाची मुंबई मंडळाची सोडत ही २१ एप्रिलला काढण्यात येईल.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहरातील मतदान २९ एप्रिलला आहे. त्यामुळेच ही मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे कळते. तर लोकसभा निवडणुकांसाठी मतमोजणी ही २३ मे रोजी आहे. २७ मे रोजी आचारसंहिता शिथील करण्यात येईल. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेसाठी किती मुदतवाढ देण्यात येणार याबाबतचा खुलासा लवकरच होण्याची चिन्हे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -