घरमुंबईबोगस व्यक्तीच्या नावे लाटले म्हाडाचे घर

बोगस व्यक्तीच्या नावे लाटले म्हाडाचे घर

Subscribe

दलाल आणि अधिकार्‍यांचे संगनमत, गुन्हा दाखल

‘म्हाडा’ कार्यालयात गरिबांना लॉटरीमध्ये लागलेली घरे लाटण्यासाठी दलाल दबा धरून बसलेले असतात. मात्र त्याचबरोबर गरीबांच्या नावे बोगस कागदपत्रे बनवून त्यांच्या नावे म्हाडाची घरे लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घर लाटणार्‍या आणि त्यांना मदत करणार्‍यांचा पोलीस आता शोध घेत आहेत. २०१० साली म्हाडाच्या लॉटरीत देवताबाई कांबळे या नावाच्या महिलेला मालाड-मालवणी येथे अतीअल्पगटात सदनिका लागली. २८ ऑगस्ट २०१३ रोजी या सदनिकाचे पत्रदेखील देवताबाई कांबळे यांच्या नावाने निघाले. त्यानुसार देवताबाई यांच्या नावाचे सर्व कागदपत्रे जमा करण्यात आली.

म्हाडातील अधिकार्‍यांनी ही कागदपत्रे तपासून ६ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांना पात्र करून त्यांच्या नावाने सदनिका मंजूर केली. २९ जानेवारी २०१४ रोजी म्हाडाच्या या सदनिकेची ठरलेली किंमत ३ लाख ६१ हजार १५० रुपये देवताबाई कांबळे यांच्या नावाने जमा करण्यात आली. परंतु या सदनिकेत गुजराती कुटुंब राहत असल्याचा अर्ज २०१५ साली म्हाडा कार्यालयात करण्यात आला. अर्ज करणार्‍या व्यक्तीने या अर्जाचा सतत पाठपुरावा केला. त्यामुळे या अर्जाची दखल घेण्यास म्हाडाच्या अधिकार्‍यांना भाग पडले. अखेर या अर्जाच्या चौकशीत २०१०साली ही सदनिका देवताबाई कांबळे यांना लागली खरी परंतु प्रत्यक्षात देवताबाई कांबळे नावाची महिलाच अस्तित्वात आहे कि नाही हे अद्याप समोर आलेले नाही. तिच्या नावाचे बोगस कागदपत्रे तयार करून म्हाडाची सदनिका भलत्याच व्यक्तीने मिळवल्याचे म्हाडाच्या लक्षात आले.

- Advertisement -

या प्रकरणी म्हाडा अधिकारी कल्पना पवार यांच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी फसवणूक, बोगस दस्तावेज तयार करणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी देवताबाई यांच्या नावावर म्हाडाने वितरित केलेल्या सदनिकेत राहणार्‍या गुजराती कुटुंबातील मुख्य व्यक्तीकडे चौकशी केली असता ही सदनिका ९लाख रुपयांत म्हाडातील दलालांकडून विकत घेतली असल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार,आतापर्यंतच्या तपासात म्हाडाची सदनिका विजेती महिला देवताबाई ही अद्याप पुढे आलेली नसून ही महिला अस्तित्वात आहे किंवा नाही हे शोधण्याचे काम सुरू आहे. या सर्व बनवाबनवीमध्ये म्हाडातील दलालासह काही अधिकार्‍यांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

देवताबाई कांबळे या महिलेच्या नावाने लागलेली सदनिका मिळवण्यासाठी म्हाडातील तीन दलालांनी काही अधिकार्‍यांसोबत हात मिळवणी केली, त्यानंतर देवताबाई या महिलेचे बोगस कागदपत्रे तयार करून त्या आधारे ही सदनिका मिळवून ती भलत्याच व्यक्तीला चढ्या भावाने विकण्यात आली. मात्र पैशाच्या वाटणीत समान हिस्सा मिळाला नाही म्हणून तीन दलालांपैकी नाराज झालेल्या एकाने अर्ज दाखल केला होता, अशी माहिती समोर येत आहे.
– राजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

- Advertisement -

म्हाडाकडून आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात दलालांसह ज्या अधिकार्‍याचे नाव समोर येईल त्यांनाही अटक करण्यात येईल.
– वैशाली वाघ, म्हाडा, जनसंपर्क अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -