आता मुख्यमंत्र्यांची परीक्षा – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षण आणि कांद्याचे घटलेले दर यावरून निशाणा साधला आहे.

Mumbai
NCP Chief Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

‘मराठा आरक्षण आणि इतर आरक्षणाच्या आकडेवारीविषयी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकांमध्ये तफावत असून आता मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण कसं देतात ते देखील पाहात आहोत,’ अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. नाशिकच्या राजकारणात बडं प्रस्थ असलेल्या प्रशांत आणि अपूर्व हिरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच, ‘हे आरक्षण देताना आता मुख्यमंत्र्यांची खरी कसोटी आहे,’ असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.

५० टक्क्यांपुढे आरक्षण जाणार कसं?

या पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, ‘मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर झालं आहे. मात्र, इतर आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मात्र आधीच ५० टक्के आरक्षण सध्या लागू आहे. आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे एकूण आरक्षणाचा आकडा ५० टक्क्यांपेक्षा पुढे जायला नको. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची ही खरी परीक्षा आहे’. तसेच, ‘सामाजिक तणाव निर्माण होईल असं कुणीही वागू नये’, असा सल्ला देखील शरद पवारांनी यावेळी बोलताना दिला.

‘मुस्लीम आरक्षणाचा विचार करावाच लागेल’

दरम्यान, शरद पवारांनी यावेळी मुस्लिम आरक्षणावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मुस्लीम आरक्षणावर विचार करावाच लागेल’, असं ते म्हणाले. ‘भाजप सरकार म्हणतं की धर्मावर आधारित आरक्षण देणार नाही. पण सरकारची ही भूमिका राष्ट्रीय ऐक्याला अनुकूल नाही. त्यामुळे मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे’, असं म्हणत शरद पवार यांनी भाजप सरकारवर देखील निशाणा साधला.


हेही वाचा – राम मंदिराच्या मुद्यावरून शरद पवारांची सरकारवर टिका

‘आम्हाला बापजादे आहेत’

यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली. ‘नाशिकच्या कांद्याचे भाव गडगडले. पण जे म्हणाले नाशिकला दत्त घेतो, त्या पालकांनाच याची चिंता नाही. मला खरंतर हे वाक्य फार मजेशीर वाटलं. आम्हाला बापजादे आहेत. त्यासाठी दत्तक बापावर अवलंबून राहायची गरज नाही. शेतकरी हाच आमचा खराखुरा बाप आहे’, असं पवार म्हणाले. तसेच, ‘राज्यकर्त्यांनी स्विकारलेल्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे’, असं देखील त्यांना सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here