घरमुंबईभारतमातामध्ये झळकला ’पांडू हवालदार’

भारतमातामध्ये झळकला ’पांडू हवालदार’

Subscribe

सध्या मराठी असो वा बॉलिवूडमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची चलती आहे. एकीकडे पानिपत,तान्हाजी,हिरकणी,फत्तेशिकस्त असे चित्रपट येत असताना मात्र दादरच्या भारतमाता चित्रपटगृहात ’पांडू हवालदार’ हा चित्रपट भाव खाऊन जात आहे. नेहमी मराठी चित्रपटांना प्राधान्य देणार्‍या भारतामाता चित्रपटगृहाने पानिपत या ऐतिहासिक चित्रपटाऐवजी ज्या चित्रपटाने इतिहास घडवला त्या दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार हा चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात लावण्यावर भर दिला.

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशहा म्हणजे दादा कोंडके.दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटयापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास चित्रपटसृष्टीकडे वळला आणि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतरही भूमिकांमध्ये वावरलेल्या दादा कोंडके यांनी आगळा विक्रम घडविला.

- Advertisement -

दादांनी मराठीत एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. अशा या दादा कोंडके यांची ओळख या तरूण पिढीला व्हावी, एकेकाळी गाजलेले चित्रपट या पिढीला बघता यावेत यासाठी भारतमाता चित्रपटगृहात महिन्यातून एकदा दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

आम्ही भारतमाता चित्रपटगृहात एकही हिंदी चित्रपट प्रदर्शित करत नाही. जूने मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत, नवीन पिढीला कळावेत यासाठी दादा कोंडके यांचा ’पांडू हवालदार’ हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा,बोटं लावीन तेथे गुदगुल्या, असे गाजलेले चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहोत.
– कपिल भोपटकर,मालक भारतमाता चित्रपटगृह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -