घरफिचर्सएक रुका हुवा फैसला

एक रुका हुवा फैसला

Subscribe

हैदराबाद इथल्या एन्काऊंटर नंतर लगेच तेथील पोलिसांचे अभिनंदनाचे मेसेज, फलक झळकू लागले. अनेकांनी फटके फोडून जल्लोष साजरा केला. काही संघटनांनी तर या एन्काऊंटरमध्ये सहभागी पोलीस कर्मचार्‍यांना बक्षिसे जाहीर केली. लोकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या मनाशी हे ठामपणे ठरवले होते की ते चारही आरोपी हेच गुन्हेगार आहेत.

हैदराबाद पोलिसांच्या कौतुकाच्या चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होत्या. वेगवेगळ्या ऑफिसातील जेवणाच्या टेबलवरील असतील चर्चा, चहा टपरीवरील असतील की, देशाचे सर्वोच्च सभागृह समजल्या जाणार्‍या लोकसभेतील असतील. या दिवसभरातील चर्चेचा विषय हा हैद्राबाद येथील पोलीस एन्काऊंटर हाच होता. बहुतेक टीव्ही चॅनेलची संध्याकाळची चर्चा ही याच विषयाला घेऊन होती.

पोलिसांनी योग्य केलं. या नराधमाना कशाला पोसत बसायचं? ना एफआयआर, ना केस, फैसला ऑन दि स्पॉट असे डायलॉग, आय सपोर्ट हैद्राबाद पोलीस अशा टॅगलाईन्सचा धुमाकूळ सुरु झाला. याची पार्श्वभूमी म्हणजे डॉ. प्रियांका रेड्डी हिचा बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याची घटना. जळलेला मृतदेह अजून लोकांच्या डोळ्यासमोर दिसत असणार. यातून ही प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. पण जबाबदार व्यक्ती, संस्था, संविधानिक व्यक्ती व संविधानिक संस्था यांचे निर्णय हे अशा भावनिक पार्श्वभूमीवर होणे ही आपल्या समाजासाठी खूपच धोकदायक बाब आहे.

- Advertisement -

एक रुका हुवा फैसला

एन्काऊंटर कसं योग्य झालं याच्या समर्थनार्थ अनेक चित्रपटातील डायलॉग सोशिअल मीडियामधून फिरत होते. ‘सिंबा’मधील अजय देवगन, ‘क्रांती’मधील बॉबी देवल असं अजून काही काही. चित्रपटांचेचं उदाहरण घ्यायचं असेल तर 1985 मध्ये आलेला एक हिंदी चित्रपट होता, एक रुका हुवा फैसला. स्वतःच्याच वडिलांचा खून केल्याचा आरोप. शिक्षा करण्यापूर्वी दहा बारा तज्ज्ञ लोकांना याविषयी अभ्यास करून आपला निर्णय एकमताने द्यायला सांगितले जाते. समितीमध्ये चर्चेच्या सुरुवातीला एक मत सोडून बाकी सर्वांची मते ही त्या आरोपीला शिक्षा व्हायला हवी या बाजूची. निर्णय एकमताने हवा असल्याने चर्चा करणे आवश्यक असते. बहुतेकांचे चर्चेत वेळ न घालवता निर्णय घेऊन टाका या दबावाला बळी न पडता तो एक माणूस आपल्या मतावर ठाम असतो की, चर्चा व्हायला हवी. चर्चेत वेळ घालवू नये असं म्हणार्‍यामध्ये जे लोक होते त्यांची प्रत्येकाची कारणे वेगळी होती. काहींना घरी लवकर जायचं होतं. काहींनी चित्रपटाची तिकिटे घेतली होती त्यासाठी वेळेवर पोहचायचं होतं.

- Advertisement -

अगदी अल्पमतात असलेल्या एका व्यक्तीने चर्चेची घेतलेली भूमिका, दबावाला बळी न पडता सतत आपले मुद्दे मांडत राहिल्याचा परिणाम म्हणजे आरोपी हा निर्दोष असल्याचं बहुमतातील अकरा लोकांना मान्य होतं आणि एक जीव वाचतो. यामध्ये एक व्यक्ती असा असतो, ज्याला त्याच्या पोटच्या मुलाने अपमानित केलेलं असतं. ही गोष्ट मानत ठेऊन तो या प्रकरणातील व्यक्तीला दंडित करून आपल्या मुलाच्या वागणुकीचा बदला घ्यायचा असतो. आरोपी हा विशिष्ट समुदायातून आल्यामुळे तो गुन्हेगारच असणार असाही एका व्यक्तीचा समज असतो, त्यामुळे त्या समुदायातील सर्वच लोकांना सरसकट संपवायला हवीत, अशी त्याची भूमिका असते.

संवादाची संस्कृती रुजविण्याचे कोणते प्रयत्न आपण करीत आहोत? चर्चेने वेळ जातो, चर्चा वायफळ असतात. चर्चा, संवाद या लोकशाहीच्या महत्वपूर्ण बाबी असतात. मार्क्सवादानेही वाद, प्रतिवाद व संवाद या मूल्यांना प्राथमिकता दिली आहे. मात्र आपल्याकडील कुटुंब व्यवस्थेतून संवादाला बगल देऊन मोठ्या व्यक्तीचा आदर करण्याला मूल्य म्हणून शिकविले जाते. या गोष्टीला इतकी प्राथमिकता दिली जाते की, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसासमोर आपलं मत मांडण्याचे धाडस होत नाही. अनेकदा मोठी माणसे धडधडीत चूक करीत आहेत, वस्तुस्थिती काहीतरी वेगळी आहे, ही बाब लहानग्यांच्या ध्यानात येऊनही ती बाब सांगितली जात नाही. ही बाब जशी लहान व मोठ्यामध्ये वयाच्या आधारे असते तसे जातीच्या आधारेही असते. उच्च जातीय लोकांच्या चुकाही निमूट, प्रतिवाद न करता सहन करायला हव्यात. ऑफिसमध्ये आपल्या वरिष्ठांचे, इथे तो वयाने लहान असला तरी ऐकून घेतलं पाहिजे, ही अशी संस्कृती रुजवली व वाढवली जाते. स्त्रियांनी पुरुषांची चुकीची, अवास्तव मते अशीच ऐकून घेतली पाहिजेत हाही याच संस्कृतीचा भाग आहे.

प्रत्येकाचे व्यक्तिगत अनुभव, एकाद्या व्यक्ती विशेष किंवा समुदाय याबद्दल असलेले त्यांचे मतं, समज यातून एखादी भूमिका बनत असते. समाजातील बहुसंख्याक, उच्च जातीय, पुरुषसत्ताक मानसिकतेचे स्त्री-पुरुष यांच्या या मतापुढे इतरांचा आवाज दबला व दाबला जातो. हैदराबाद इथल्या एन्काऊंटर नंतर लगेच तेथील पोलिसांचे अभिनंदनाचे मेसेज, फलक झळकू लागले. अनेकांनी फटके फोडून जल्लोष साजरा केला. काही संघटनांनी तर या एन्काऊंटरमध्ये सहभागी पोलीस कर्मचार्‍यांना बक्षिसे जाहीर केली. लोकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. हे सर्व करीत असताना त्यांनी आपल्या मनाशी हे ठामपणे ठरवले होते की ते चारही आरोपी हेच गुन्हेगार आहेत.

दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका अभ्यासवर्गात आरक्षण विषयावर संवाद सुरू होता. यामध्ये प्रत्येकजण आपापल्या भूमिका मांडत होते. त्यातील एकाने सुरुवात अशी केली की, माझा या विषयाचा काही अभ्यास नाही, पण माझं ठाम मत आहे, की जातीच्या आधारे आरक्षण ही चुकीची गोष्ट आहे. अभ्यास नसणे, एखादी गोष्ट स्पष्ट माहिती नसणे यात गैर काही नाही. ती माहिती आपण मिळवू शकतो. मात्र अपुर्‍या माहितीच्या आधारे आपली मते ठाम असणे ही घातक गोष्ट आहे. 2017 या वर्षामध्ये गुडगाव, दिल्ली येथील एका शाळेत एका खुनाची घटना घडली होती. शाळेच्या बसचा कंडक्टर हा त्यामधील आरोपी होता. आरोप होता की त्याने एका आठ वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ करून त्याचा चाकूने खून केला आहे. पोलिसांनी बरेच संशोधन करून हे जवळपास सिद्ध केलं होतं.

समाजात, पालकांत आपले मुलं सुरक्षित नाहीत, अशा नराधमाला कठोर शिक्षा केली पाहिजे असे मत व्यक्त केले जात होते. पोलिसांनी जर एखादी चकमक घडवून त्याचा एन्काऊंटर केला असता तर, समाजाने पोलिसांच्या शौर्याचे कौतुकच केलं असतं. पण हे असं काहीही झालं नाही. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. सीबीआयने केलेल्या संशोधनातून यातील वेगळीच बाजू पुढे आली. त्याच शाळेत शिकणार्‍या अकरावीमधील दुसर्‍या मुलाने, त्याचा अभ्यास न झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्यासाठी म्हणून त्या चिमुकल्याचा गळा कापला होता. ज्याला आरोपी म्हणून पकडण्यात आले होते, त्यावर पोलिसी अत्याचार करून गुन्हा जवळपास कबूल करून घेतला होता. मात्र तो कंडक्टर निर्दोष निघाला. अलिप्त राहून हिंसेचे समर्थन करणे, कठोरातील कठोर शिक्षेचे समर्थन करणे किती रोमांचक गोष्ट आहे. यासाठी अनेकजण शिवाजीराजांचेही दाखले देतात.

उम्र भर गालिब यही भूल करता रहा
धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा

अनकेदा प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधली जातात. आपले नित्याचे व्यवहार, आपल्या घरातील, चहा व पान टपरी वरील गप्पा, ऑफिसमधील संवाद, जेवणाच्या टेबलवरील चर्चा, समवयस्कामधील संवाद यातून लोकांची मने, स्वभाव, त्यांची मते, विचार घडत असतात. विशिष्ट मते, विचार असणार्‍या व्यक्तीसमूहांची संस्कृती बनत असते. आपल्या समाजातील बलात्कारी व्यक्ती किंवा अनेक प्रकारच्या गुन्ह्यातील व्यक्ती या अशाच कुठच्या तरी समुदायाचे एक भाग असतात. गुन्हा घडण्यापूर्वीपर्यंत ते सामान्य असतात. अशी व्यक्ती गुन्हेगार का होते ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. अनेकांना या गोष्टी म्हणजे वायफळ चर्चा वाटतील. कडक शिक्षा आणि शिक्षेचा धाक यातून गुन्हे कमी होतील असा एक आशावाद समाजात जोर धरत आहे. अनेक प्रतिष्ठित लोक, लोकप्रतिनिधी हीच भूमिका घेत आहेत. लिंगभाव शिक्षण, लोकशाही मूल्यांची रुजवणूक याकडे अगदीच कमी लक्ष दिले जाते. गुन्हे होऊ नयेत यासाठीच्या यंत्रणा नसणे. गुन्हा घडल्यानंतर देखील पितृसत्ताकतेच्या पगड्यातून पीडितांच्या परिवारांना मिळणारी वागणूक. तुमची मुलगी किंवा बहीण हिचीच वागवणूक ठीक नसेल असे तर्क देणे, गुन्हा नोंदविण्यास नकार देणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. या पार्श्वभूमीवर आपण विजय साजरा करणे म्हणजे एका अंधकाराकडे प्रवास करणे आहे.

-बसवंत विठाबाई बाबाराव: (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक असून, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे संस्थेत कार्यरत आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -