घरमुंबई'डॉक्टर आणि पेशंटच्या नातेवाईकांमध्ये संघर्ष टाळण्याचे प्रयत्न' - डॉ. हेमंत देशमुख

‘डॉक्टर आणि पेशंटच्या नातेवाईकांमध्ये संघर्ष टाळण्याचे प्रयत्न’ – डॉ. हेमंत देशमुख

Subscribe

महापालिका व राज्य सरकारच्या अनेक हॉस्पिटल्समध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणारे रुग्ण अधिकच आजारी पडतात. त्यामुळे भविष्यात हॉस्पिटलमधील स्वच्छतेला प्राधान्य देत कुत्री, मांजरी व उंदरांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर रुग्ण, डॉक्टर यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. स्वच्छता, सुरक्षा याबरोबरच रुग्णांना उत्तम, अद्ययावत उपचार मिळण्याला नववर्षात प्राधान्य देणार आहे, असे केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधी भाग्यश्री भुवड यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले.



नवीन वर्षात केईएम हॉस्पिटलसाठी काय नवा संकल्प आहे?

केईएम हे एक अत्यंत नावाजलेले हॉस्पिटल आहे. त्यामुळे ते रुग्णाभिमुख करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहेत. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आणखी आजारी पडू, असे वाटू नये यासाठी सर्वात आधी हॉस्पिटलच्या स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच, सुट्ट्यांच्या दुसर्‍या दिवशी ओपीडीत सर्वात जास्त गर्दी होते. त्यामुळे, रुग्णांना सरप्राईज गिफ्ट म्हणून ओपीडी रजिस्ट्रेशन अर्धा तास आधी सुरू केलं जाणार आहे. म्हणजेच आठ वाजता सुरू होणारी ओपीडी साडेसात वाजताच सुरू केली जाणार आहे.

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये मांजरे आणि कुत्र्यांचा वाढलेला सुळसुळाट कमी करण्यासाठी प्रयत्न होणार का?

अनेकदा हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर वॉर्डमध्ये कुत्री आणि मांजरींचा सुळसुळाट पाहायला मिळतो. बर्‍याच लोकांनी असं निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे प्राण्यांच्या डॉक्टरांतर्फे हॉस्पिटलमध्ये आढळणारी कुत्री किंवा मांजरींची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पण, ही प्रक्रिया खूप महाग आहे. कोणत्याच रुग्णाला वॉर्डमध्ये आपल्या शेजारी मांजर, कुत्रा नको असतो. त्यामुळे, स्वच्छतेसाठी हा निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

आग लागल्यानंतर रुग्णांना कसं तात्काळ हलवता येईल यासाठी प्रयत्न कसे केले जाणार आहेत?

आग लागल्याची घटना घडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये धावपळ होते. रुग्णांची काळजी घेण्यासाठी जी रुग्णांची खाट असते ती सरकून बाहेर काढता येईल आणि सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्या रुग्णांना खाटेवरुन उचलून नेण्याची गरज पडणार नाही, त्या सरकवून नेता येतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे.

केईएमचं बोधवाक्य मराठीत भाषांतरीत कधी करणार?

येत्या २२ तारखेला केईएमचा वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर केईएमचं जे इंग्रजीत बोधवाक्य आहे, त्याचं मराठीत भाषांतर केलं जाणार आहे. त्यासोबतच बर्‍याच हॉस्पिटलमध्ये मिशन स्टेटमेंट लावलेलं असतं, तसंच, केईएममध्येही लावलं जाणार आहे. जेणेकरुन डॉक्टरांना उपचारांशिवाय हॉस्पिटलमध्ये कसं वागायचं आहे किंवा आपलं नेमकं काम काय आहे? नेमकं आपलं उद्दिष्ट काय आहे? याची माहिती होईल. फक्त डॉक्टरांनाच नाही तर इथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही याची जाणीव राहील. जे करायचं आहे त्याचा पाठपुरावा होऊन ते साध्य होईल.

निवासी डॉक्टरांसाठी काय करणार?

रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीचं प्रमाण कमी करण्यासाठी नातेवाइकांसोबत सुसंवाद कशापद्धतीने साधता येईल? यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी त्याचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. कारण, जे विद्यार्थी आहेत कुठेही गेले तरी जी शिकवण त्यांना मिळालेली आहे ते ती कधीच विसणार नाहीत. रुग्णाच्या नातेवाइकांना योग्य त्या पद्धतीने ते डॉक्टर्स वागणूक देतील. एथिक्स आणि ह्युमॅनिटी हा विषयच अभ्यासक्रमात अंतर्भूत केला जाणार आहे. अंडर ग्रॅज्युएट एमबीबीएस कोर्समध्येच हा विषय शिकवला जाईल. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात नेमकी काय सुधारणा करायची आहे यावरही चर्चा सुरू आहे.

औषधांच्या पुरवठ्यासाठी नेमका काय प्रस्ताव आहे?

केईएममध्ये सध्या सर्व प्रकारच्या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे तुटवडा होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एका औषधाचे वेगवेगळे वेंडर्स असतात. त्यामुळे, तेवढा तुटवडा हॉस्पिटलमध्ये जाणवत नाही. त्यासोबतच महात्मा फुले योजना आणि आयुष्यमान भारत या योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. जेणेकरुन गरीब आणि आर्थिकदृष्ठ्या दुर्बल असलेल्या रुग्णांना मदत होईल. या योजनांमधून औषधं, गोळ्या वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत फायदा होणार आहे.

योग्य आणि वेळेवर निदानासाठी सोनोग्राफी मशीन्स उपलब्ध केल्या जाणार का?

आताच केईएममध्ये ६ सोनोग्राफी मशीन्स घेतल्या आहेत. ज्यात नवीन अ‍ॅप्लिकेशन्स आहेत. रुग्णांच्या आजारांचं योग्य निदान व्हावं यासाठी मदत होणार आहे. त्यासोबतच तिन्ही हॉस्पिटल्समध्ये २ एमआरआय आणि २ सीटीस्कॅन मशीन्स आणल्या जाणार आहेत. त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. ज्यामुळे एमआरआय आणि सिटीस्कॅनला होणारी गर्दी कमी होईल. त्यासाठी टेक्निशियन्सही उपलब्ध आहेत.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -