गोवंडी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्‍याला लाच घेताना अटक

Mumbai
bribe

गोवंडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक हरिभाऊ खरात यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. दिपक यांच्यावर तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाचेची मागणी करुन 25 हजार रुपयांची लाच घेताना कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तृतीयपंथी तक्रारदार

यातील तक्रारदार तृतीयपंथी असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या मामेभावावर गोवंडी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास दिपक खरात यांच्याकडे होता. याच गुन्ह्यात नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याची स्थानिक न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. या गुन्ह्यात त्यांच्या मामेभावावर प्रतिबंधक कारवाई न करता त्याला मदत करण्यासाठी दिपक खरात यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम न दिल्यास त्याच्याविरुद्ध कारवाईची धमकी देण्यात आली होती.

रंगेहाथ पकडले

ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी 25 हजार रुपये देण्याचे मान्य करुन दिपक खरातविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी दिपक खरात यांना तक्रारदाराकडून 25 हजार रुपयांचा लाचेचा हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ अटक केली. खरात यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्याचे वृत्त समजताच संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here