घरमुंबईड्रग्ज माफियांशी पोलिसांचे संबंध

ड्रग्ज माफियांशी पोलिसांचे संबंध

Subscribe

पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायासह तिघांवर गुन्हा

ड्रग्ज माफियाशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर वालिव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि त्यांच्या एका साथीदारांसह वालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात वालिव पोलीस ठाण्यात पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे.

सध्या नागपूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले विजय चव्हाण वालिव पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत उपनिरीक्षक होते. ऑगस्ट महिन्यात मुंबई-अहमदाबाद हायवेवरील किनारा धाब्यात एक जण ड्रग्ज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती एका खबर्‍याने दिल्यावरून चव्हाण यांनी पोलीस हवालदार भीमकोंडा व्हसकोटी याच्यासह सापळा रचून आरोपीला अटक केली होती. मात्र, दोघांनीही आरोपीवर कारवाई न करता मोठी रक्कम करून तडजोड करून त्याला सोडून दिले. तसेच त्याच्याकडून जप्त केलेले 75 हजार रुपये किमतीचे हेरॉईन पोलिसांसाठी काम करीत असलेला खासगी इसम निखिल ठाकूर याच्याकडे ठेवायला दिले होते.

- Advertisement -

दरम्यान, वालिव पोलिसांनी जप्त केलेल्या विलायती सिगारेटमधील सव्वा दोन कोटींची सिगारेट चोरून विकल्याप्रकरणी मुद्देमाल शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख यांच्यावर 11 सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास करीत असलेल्या डीवायएसपी अश्विनी पाटील यांना ड्रग्ज प्रकरणाची माहिती मिळाली असता त्यांनी पोलीस ठाण्यात खासगी काम करीत असलेल्या ठाकूरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता ड्रग्जचा प्रकार उजेडात आला. इतकेच नाही तर ठाकूर याच्या बॅगेत असलेले ड्रग्जही सापडले. चौकशीत ठाकूरने सविस्तर माहिती दिल्यानंतर धक्कादायक प्रकार उजेडात आला.

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर वालिव पोलिसांनी मंगळवारी उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस हवालदार भीमकोंडी व्हसकोटी आणि निखिल ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ठाकूर याला अटक करण्यात आली असून व्हसकोटी फरार झाला आहे. चव्हाण याला गेल्या महिन्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाल्यानंतर त्याची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. चव्हाण आणि व्हसकोटी यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, सव्वा दोन कोटी रुपये किमतीच्या विलायती सिगारेट चोरीप्रकरणी अटक असलेल्या शेख याच्याकडून अनेक धक्कादायक बाबी उजेडात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकतर पोलिसांनी पकडलेला सव्वा तीन कोटी रुपयांच्या सिगारेटचा साठा पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या एका ट्रकमध्येच होता. शेख मुद्देमाल शाखेचा प्रमुख असला तरी माल प्रत्यक्षात त्याच्या ताब्यात आणि पोलीस ठाण्यात नव्हता. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून माल चोरण्याचे धाडस एकटा शेख करूच शकत नाही. यात पोलीस ठाण्यातील काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा हात असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. पोलिसांकडून याबाबत अद्याप मौन बाळगले जात असून एकट्या शेखचा बळी देऊन प्रकरण मिटवले तर जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -