घरमुंबईपोस्टाचा सर्व्हर मंदावला

पोस्टाचा सर्व्हर मंदावला

Subscribe

सेवांवर परिणाम, ग्राहक हैराण

पोस्टाचा सर्व्हर मंदावल्यामुळे अनेक पोस्ट कार्यालयांमधील कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांना तासनतास खोळंबून राहावे लागत आहे. पोस्टाच्या अनेक ग्राहकांसह पेन्शनच्या सेवांसाठी पोस्टावर अवलंबून असणार्‍या जेष्ठ नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू झाल्यानंतर पोस्टाच्या सेवांवर परिणाम होऊन त्याचा त्रास या आधीही ग्राहकांना झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर पोस्टाचे संगणकीकरण झालेले असताना सर्व्हर मंदावल्यामुळे कामे ठप्प झाली आहेत. एकाच कामासाठी पुन्हा पुन्हा फेर्‍या माराव्या लागत असल्यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पोस्टाने आयटी मॉडर्नायझेशन प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण राज्यात पोस्टातील कार्यालयाचे संगणकीकरणाचे काम हाती घेतले आहे. पण बंगळुरू येथील सेंट्रल सर्व्हरमध्ये उद्भवणार्‍या तांत्रिक अडचणींचा फटका ग्राहकांना तसेच पोस्टाच्या कर्मचार्‍यांनाही बसत आहे. पोस्टाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्यावर सर्व्हर धीमा होण्याचे प्रकार समोर येत आहेत. परिणामी संपूर्ण सेवा कोलमडत आहे. तसेच दैनंदिन अकाऊंट्सचे काम जोपर्यंत सॉफ्टव्हेअरमध्ये अपडेट होत नाही तोवर कर्मचार्‍यांनाही कार्यालय सोडता येत नाही, त्यामुळे कर्मचार्‍यांंनाही उशिरापर्यंत थांबून कामे पूर्ण करावी लागत आहेत. दररोज कामाच्या नियमित तासांपेक्षा सरासरी तीन ते चार तास जास्त वेळ थांबून काम करावे लागते.

- Advertisement -

पोस्टाच्या कामकाजात महिन्याच्या शेवटी तसेच महिन्याच्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात. एकाचवेळी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे व्यवहार होत असल्यानेच पोस्टाच्या सेवेवर हा ताण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याआधीही अनेकवेळा पोस्टाची सेवा सर्व्हर धीमा झाल्याने ठप्प झाल्याचे प्रकार समोर आले होते. पोस्टाच्या दैनंदिन सेवांसोबतच इतर सेवांचा समावेशही पोस्टाच्या कार्यालयात करण्यात आला आहे. त्यामध्ये आधार कार्ड माहिती अद्ययावतीकरण, नोंदणी, पासपोर्ट सेवा, वीज बिल, टेलिफोन बिल याासारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक सेवांचा ताण येतो. पोस्टाच्या अनेक कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर संगणकीकरण झालेले आहे. त्याचा विशिष्ट दिवसानंतर सर्व्हरवर ताण येतो. त्यामुळे तो मंदावतो, पण यावर तोडगा काढण्यासाठी पोस्टाचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोस्टाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -