घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टदक्षिण मध्य मतदारसंघात दलित मते निर्णायक!

दक्षिण मध्य मतदारसंघात दलित मते निर्णायक!

Subscribe

लोकसभा मतदारसंघ 30

लोकसभा मतदार संघ ३० अर्थात दक्षिण मध्य मुंबईमध्ये चेंबूर, धारावी, अणुशक्तीनगर हा भाग सर्वात मोठा असून त्यामध्ये दलित मतदार संघ मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या भागातून दलित उमेदवार दावे ठोकत असतात. या मतदार संघातील दलित मते ही निर्णायक मते ठरणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी युती झालेली आहे, या ठिकाणी सेनेचे खासदार राहुल शेवाळे यंदाही इच्छूक आहेत, असे असूनही रिपाईचे रामदास आठवले हे आग्रही आहेत.

माहुलवासीयांचा प्रदुषणाचा वारंवार डोक काढणारा प्रश्न, देवनार डंपिंग ग्राऊंडचा मुद्दा, प्रदूषण करणार्‍या इंडस्ट्रीज अशा गर्तेत असणारा परिसर म्हणून चेंबूर माहुल परिसराची नवी ओळख पुढे येऊ लागली आहे. त्यामध्ये वारंवार प्रयत्न करून आता कुठे धारावी पुनर्विकासाच्या जागतिक निविदा प्रक्रियेला थोडाला धक्का मिळाला आहे, तोदेखील निवडणुकीच्या तोंडावर. अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न आणि कोळीवाड्यांच्या विकासाचा प्रश्न आजही तितकाच आ वासून उभा आहे. त्यामुळेच जनसामान्यांसाठीच्या अडचणी संपता संपेना असे आव्हान या लोकसभा मतदारसंघात इतक्या वर्षांनंतरही कायमच आहे.

- Advertisement -

झोपडपट्टीतील दलित आणि मुस्लिमबहुल मतदारांपासून ते दादरच्या टोलेजंग इमारतीत राहणारा उच्चभ्रू मतदार अशी दक्षिण मध्य मुंबईची ओळख आहे.

युतीच्या जागावाटपाच्या समीकरणात या मतदार संघासाठी पुन्हा एकदा शिवसेनेला ही जागा मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदीच्या लाटेच्या जोरावर नगरसेवक पदावरून थेट खासदारकीच्या तिकिटावर मोठे यश मिळाले होते. यंदा मात्र लोकसभा निवडणूक जिंकण्याची समीकरणे ही वेगळी असणार आहेत. भाजपच्या मदतीनेच या मतदारसंघातही शिवसेनेची जागा पक्की बोलली जात आहे. भाजपच्या साथीशिवाय शिवसेनेला दक्षिण मध्यच्या जागेचा पेपर कठीणच जाईल अशी कुरबुर स्थानिक पातळीवर आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हेवे दाव्याचे वारे बदलत आता युतीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक कार्यक्रमांच्या ठिकाणी एकमेकांच्या साथीनेच दोन्ही पक्षांमध्ये समंजस्याचे वातावरण पहायला मिळत आहे. पण काँग्रेसदेखील संपूर्ण शक्तीने या मतदारसंघात कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राहुल शेवाळे यांच्या विजयाआधी सातत्याने दोन टर्म काँग्रेसच या भागातून निवडून आली आहे. पण यंदा काँग्रेसकडून उमेदवारीसाठी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर माजी खासदार एकनाथ गायकवाड हेदेखील या भागातून निवडणूक लढवण्यासाठी पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. त्यामुळेच काँग्रेसमधून खासदारकी नेमकी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

Chart 2014

भाजपमधून राज्यसभेवर खासदारकी मिळवलेले आणि राज्यमंत्रीपद मिळवलेले रामदास आठवले यांनीही यंदा दक्षिण मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच या मतदारसंघात दलित मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन पहायला मिळणार आहे. चेंबूर, धारावी, अणुशक्तीनगर या परिसरातील दलित तसेच मुस्लिम मतांचा कल यंदा कोणत्या उमेदवाराकडे असणार हा मोठा प्रश्न असणार आहे. रामदास आठवले यांना फॉलो करणारा एकगठ्ठा मतदारांचा गट आहे. तर एकनाथ गायकवाड यांचा जनसंपर्कही तितकाच दावेदारी मजबूत करणारा आहे. मुणगेकरांच्या पाठीशी काँग्रेस उभी राहतानाच या मतदारसंघाची जबाबदारी त्यांना देणार का असाही एक न सुटलेला प्रश्न आहे. राहुल शेवाळे यांनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत केलेल्या शिस्तबद्ध कामासाठी मतदार काय कौल देणार हेदेखील या चुरशीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहायला मिळणार आहे.

तीन आमदार शिवसेनेचे, एक भाजपचा आमदार तर दोन काँग्रेसचे आमदार असे पक्षीय बलाबल या मतदार संघातले आहे. मुंबई महापालिकेवर एकुण 36 पैकी 21 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. शिवसेनेचे पक्षीय बलाबल मोठे असले तरीही भाजपच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजपशी गट्टी करूनच हा हमखास विजय मिळवून देणारा मतदारसंघ जिंकण्याशिवाय दुसरा कोणताही वेगळा फॉर्म्युला नाही. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आदित्य शिरोडकर यांना जवळपास 73 हजार मतदान झाले होते. दादर परिसरातील मोठ्या प्रमाणावर झालेले मतदान आणि राज ठाकरे यांचा फॅन फॉलोइंग यासारखी कारणे त्यावेळी झालेल्या मतदानासाठी कारणीभूत ठरली होती.

यंदा मात्र मनसेची क्रेझ पुरती उतरलेली आहे. त्यामुळे हक्काच्या दादर परिसरातून कमबॅक करणे मनसेला खूपच कठीण जाईल असे दिसत आहे. आम आदमी पार्टीचीही आता अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपच्या सुंदर बालकृष्णन या उमेदवाराला अवघे 28 हजार मतदान झाले होते. यावेळी आपचा महाराष्ट्रासह मुंबईतला ओसरलेला प्रभाव पाहता आम आदमी पक्षासाठीही अस्तित्वाची लढाई आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जवळपास 10 हजार मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला होता. हे मतदार आता कोणत्या पक्षाकडे वळतात हे आगमी निवडणुकीत पाहण गरजेच आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -