घरमुंबईरेल्वे ग्रुप डी परीक्षेत सावळागोंधळ !

रेल्वे ग्रुप डी परीक्षेत सावळागोंधळ !

Subscribe

 परीक्षार्थ्यांवर गुणांचा भडीमार

रेल्वे भरती बोर्डाकडून रेल्वेच्या डी ग्रुपच्या पदासाठी मागच्या वर्षी मेगा भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यावेळी काही १.८९ कोटी मुलांनी ही परीक्षा दिली. मात्र ग्रुप डीचा पेपर १०० गुणांचा असताना काही परीक्षार्थ्यांना १११, १२०,१४८ पेक्षाही जास्त गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाचा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. लाखो परीक्षार्थांनी रेल्वे बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच देशभरातील विद्यार्थ्यांनी निकाल पुन्हा प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

रेल्वे भरती बोर्डाने रेल्वे विभागाच्या विभिन्न ९५ हजार पदांसाठी देशभरात परीक्षा घेतली होती. यातील ९५ हजार पदांमध्ये डी ग्रुपसाठी एकूण ६२ हजार ९०२ पदांचा समावेश होता. जेव्हा ही परीक्षा घेण्यात आली, तेव्हा मोठ्या तांत्रिक कारणामुळे परीक्षेचा गोंधळ उडाला होता. आता ४ मार्चला या डी ग्रुपच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातसुद्धा गोंधळ उडाला आहे. ग्रुप डी पदासाठी फक्त १०० गुणांची परीक्षा होती. मात्र निकालात अनेकांना १०० पेक्षा जास्त म्हणजे १११, १२०,१४८ असे गुण मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर ज्या परीक्षार्थांना ६०, ६५, ६६,७० आणि ७१ गुण मिळाले आहे, त्यांना नापास केले आहे. तर ज्यांना ४२, ४५ गुण मिळाले आहे, त्यांना रेल्वे भरती बोर्डाने पास केले आहे. त्यामुळे ज्या परीक्षार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला ते नापास झाले आहेत. त्यामुळे देशभरातील अनेक विधार्थी संघटनांनी याचा विरोध करत रेल्वेचा डी ग्रुपचा परीक्षा निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. जर रेल्वे बोर्डाने ही मागणी मान्य केली नाही तर देशभरात विद्यार्थ्यांकडून रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न
रेल्वेच्या ग्रुप डीच्या परीक्षांच्या निकालातील गोंधळाबाबत मुंबई रेल्वे भरती बोर्डाच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या संबंधित आम्ही सेंट्रल रेल्वे सीपीआरओ आणि पीआयबीला प्रेस नोट दिली आहे. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही. त्यामुळे असे निदर्शनास येत आहे की, रेल्वे भरती बोर्ड आपल्या चुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

ट्विटरकडेही दुर्लक्ष
रेल्वेच्या ग्रुप डीच्या परीक्षांचा निकाल लागताच देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी यासंदर्भात ट्विटरच्या माध्यमातून रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्विटरवरही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे रेल्वेच्या ग्रुप डीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे वर्षभराचे परिश्रम वाया गेले आहेत. या गैरसोयीला रेल्वे भरती बोर्ड जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सोबतच महाराष्ट्राच्या काही विद्यार्थी संघटनांनीही आता रेल्वे बोर्डाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -