काँग्रेसचा आता बरमोडा झाला आहे – रावसाहेब दानवे

नेहमीच आपल्या वादग्रस्त भाषणामुळे चर्चेत राहिलेले भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Danve Nashik
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलताना रावसाहेब दानवे.

नेहमीच आपल्या वादग्रस्त भाषणामुळे चर्चेत राहिलेले भाजपाचे केंद्रीय मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस ही एका परिवाराची पार्टी आहे. त्यामुळे आज या पार्टीचा बरमोडा झाला, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे. भाजपाच्या विशेष प्रदेश कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली.

काय म्हणाले रावसाहेब दानवे 

आज काँग्रेसमध्ये कुणी अध्यक्ष व्हायला तयार नाही. गोव्यात १० आमदार फुटले, कर्नाटकचे आमदार फुटले, पण हे दोष कुणाला देतात तर भाजपाला. अरे पण तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी राजीनामा दिला तर आमदाराचा दोष काय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसला गळती लागली आहे. त्यामुळे राज्यात एक अध्यक्ष केला. त्याच्या खाली पाच कार्याध्यक्ष जोडले. त्यामुळे आता कार्यकर्ते ऐकणार तरी कुणाचे, कारण सगळे एकाच वजनाचे आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला. त्यामुळे काँग्रेसमधील जे चांगले आहेत. त्यांना पक्षात घ्या आणि भाजपाच्या कामाला लावा, असे देखील दानवे म्हणाले. एवढंच नाही तर काँग्रेस म्हणत होत, ‘गरिबी हटाव’ पण आता गरिबांनी ठरवलं की ‘काँग्रेसला हटवायचे’ आणि गरिबांचा पंतप्रधान करायचे. आज गरिबांचे पंतप्रधान झाल्याचेही ते म्हणाले.

दादांच्या हातात दिलेला झेंडा-दांडाही मजबूत करून दिला

दरम्यान, नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हातात मी झेंडा-दांडा दिला असून झेंडा आणि दांडा दोन्ही मजबूत करून दिल्याचे त्यांनी संगीतले. दादाचा अनुभव हा फार मोठा आहे. याही पुढे दादा पक्ष मोठा करतील, याचा मला विश्वास आहे. गिरणी कामगारांचा मुलगा आज एका पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो हे फक्त भाजपामध्ये होऊ शकते, असे देखील दानवे म्हणाले. तर आता एक दादा गेला आणि दुसरा आला? त्यामुळे दादा काय आता तुमचा पिच्छा सोडत नाही, असे देखील दानवे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय ठेवला. त्यामुळे मी चांगले काम करू शकलो, असे दानवे म्हणाले.

पण मी माझी भाषा सोडणार नाही

दरम्यान, मी प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा मीडियाने माझ्या वक्तव्यामुळे मला वेळोवेळी चर्चेत ठेवले. पण मी माझी भाषा सोडणार नाही, कारण ती माझी ओळख आहे आणि त्यामुळेच मी माझी ओळख सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. एवढंच नाही तर मी सिरीयस झालो आणि भाषण सिरीयस केली तर सगळे म्हणतील, दानवे नाराज आहेत की काय? पण मी नाराज नाही? मी केंद्रात मंत्री झालो. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नसल्याचे ते म्हणाले.