घरमुंबईरोजा काळातील त्या ‘चपाती’ प्रकरणावरून राष्ट्रवादीचा राजन विचारेंवर हल्ला

रोजा काळातील त्या ‘चपाती’ प्रकरणावरून राष्ट्रवादीचा राजन विचारेंवर हल्ला

Subscribe

महाराष्ट्र सदनमध्ये रोजा असतानाही चपाती खायला लावली असल्याचे प्रकरण ऐन निवडणुकीच्या तोंडावर उकरून काढून राष्ट्रवादीने पुन्हा एकदा राजन विचारे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐन रोजाच्या काळातच लोकसभेच्या निवडणुकाही आल्याने हे प्रकरण राजन विचारेंना जड जाण्याची भीती कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. हा समाज आजही नाराज असल्याचा प्रचार करून मुस्लिम मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकरणांना जनतेसमोर आणणे म्हणजे या समाजाची मते मिळवण्याचा हा प्रकार असून, रोजा प्रकरणी घडलेल्या घटनेबाबत त्यावेळेस दिलगिरी व्यक्त करण्यात आली असल्याचे सेना पदाधिकार्‍यांंचे म्हणणे आहे.

काय होते प्रकरण?

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते. तसेच त्यांना देण्यात येत असलेल्या जेवणाचा दर्जाही व्यवस्थित नसल्याच्या आरोपावरून 17 जुलै रोजी शिवसेनेच्या 11 खासदारांनी यासंदर्भात उपस्थित कर्मचारी व पर्यवेक्षकाकडे राग व्यक्त केला. खासदार कृपाल तुमाने यांनी तेथील पोळी उचलली आणि पोळीचे तुकडे करायला किती त्रास होतो, ते दाखवित असताना खा. राजन विचारे यांनी पोळीचा तुकडा उपस्थित असलेल्या पर्यवेक्षकाला खावून दाखव, असे म्हणून त्याच्या तोंडाकडे नेला. परंतु माझा उपवास आहे. असे त्याने सांगितल्यावरही विचारे थांबले नाहीत. ज्या पर्यवेक्षकाच्या तोंडात पोळी कोंबली तो मुसलमान असून त्याचा त्या दिवशी रोजा होता. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी अरशदने आपल्या तक्रारीत सांगितले की, सर्व पाहुणे, पत्रकार आणि इतर कर्मचार्‍यांसमवेत स्वयंपाक घरात घुसले. मी तेव्हा त्यांची जेवण बनवत होतो. मी त्यावेळी आयआरसीटीसीचा गणवेश घातलेला होता. त्यावर माझे नाव ’ ‘अरशद’ असे स्पष्ट लिहिले होते. हे सर्व माहित असूनही त्यांनी मला पकडले आणि बळजबरीने माझ्या तोंडात चपाती टाकली. यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

- Advertisement -

हे प्रकरण घडले तेव्हा सर्व पाहुणे मंडळी कॅन्टीनच्या व्यवस्थापकावर राग व्यक्त करत होती. मात्र व्यवस्थापक जागेवर नसल्याने समोर असलेल्या पर्यवेक्षक आणि कर्मचार्‍यांवर तो राग व्यक्त करण्यात आला. त्यावेळी पर्यवेक्षक असलेला अरशद जुबेरही इतर सामान्य व्यक्तीसारखा असल्याने तो हिंदु, मुसलमान किंवा अन्य कोणत्या धर्माचा आहे हे कोणाच्याही डोक्यात येणे शक्यच नव्हते. त्यामुळे अनावधानाने हा प्रकार झाला. सातत्याने एखाद्या गोष्टीची तक्रार असली आणि त्यात सुधारणा होत नसेल तर सर्वसामान्य व्यक्तीही अशाप्रकारे राग व्यक्त करतो त्यातीलच तो प्रकार होता. त्याबद्दल आम्ही माफी मागितली. मात्र निवडणुकीच्या तोंडावर या प्रकाराला उजाळा देणे म्हणजे मतांसाठी काहीही करणे असाच अर्थ होतो.
– प्रताप सरनाईक, आमदार

विचारे यांनी संसदेत जाताच तेथील महाराष्ट्र सदनमध्ये मुस्लिम समाजाच्या बांधवाला ऐन रोजामध्ये चपाती भरवली. एखाद्या खासदाराला कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला अपमानित करण्याचा अधिकार कोणी दिला. कॅन्टीनमधील जेवण व्यवस्थित नसेल तर याचा अर्थ असा नाही की जबरदस्तीने कोणाच्या तोंडात जेवण कोंबायचे. नियमानुसार तुम्ही तक्रार करून त्याची विचारणा करायला हवी होती. तुम्ही खासदार आहात याबद्दल संसदेत विचारणा करायला हवी होती. मात्र तसे न करता त्यांनी जाणीवपूर्वक असा प्रकार केला.
-प्रकाश दुबोले, मिरा भाईंदर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -