घरमुंबईCAAवर मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका असू शकते, पण आमचा विरोध - शरद पवार

CAAवर मुख्यमंत्र्यांची वेगळी भूमिका असू शकते, पण आमचा विरोध – शरद पवार

Subscribe

सीएएच्या मुद्द्यावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये काहीसे मतभेद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

एकीकडे राज्यात स्थापन झालेल्या महाविकासआघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधक म्हणजेच भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष सोडत नसताना सत्ताधाऱ्यांमध्ये काही मुद्द्यांवर असलेल्या मतभेदांमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळण्याची शक्यता आहे. सीएएच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेला शरद पवारांनी असहमती दर्शवल्यामुळे आता सत्ताधाऱ्यांमधल्या मतभेदांच्या मुद्द्यांमध्ये आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सीएएला आमचा पाठिंबा, पण एनआरसीला विरोध’, अशी भूमिका जाहीर केली होती. मात्र, त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी असहमती दर्शवली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी ही भूमिका मांडली.

काय म्हणाले शरद पवार?

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाविषयी वेगळी भूमिका असू शकते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणाल, तर आमचा त्याला विरोधच आहे. आम्ही या कायद्याच्या विरोधात मतदान केलं आहे’. मात्र, असं असताना लवकरच एकमत होण्याची आशा देखील त्यांनी व्यक्त केली. ‘राज्यात आम्ही शिवसेनेसोबत आघाडीमध्ये सत्तेत आहोत. त्यामुळे मुद्द्यांवर एकमत असायला हवं. त्यासंदर्भात आम्ही लवकरच शिवसेनेसोबत चर्चा करू’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

‘सगळे परदेशी पाहुणे अहमदाबादमध्ये जातात’

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी मोदींच्या गुजरात प्रेमावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ‘गेल्या पाच वर्षांत असं दिसून आलं आहे की भारतात येणारे आंतरराष्ट्रीय पाहुणे अहमदाबादमध्ये जातात. आणि तिथल्या झोपडपट्टीवासियांना हटवण्याचा मुद्दा असेल, तर ते तर साहजिक आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी झोपडपट्टी परिसर झाकायला सुरुवात केली आहे’, असं देखील पवार यावेळी म्हणाले.


हेही वाचा – दिल्लीला ‘ती’ टीप कुणी दिली? राज्य सरकारने तपास करावा-शरद पवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -