घरमुंबईशिवसेनेचे मिशन अयोध्या

शिवसेनेचे मिशन अयोध्या

Subscribe

१ लाख शिवसैनिकांची धडक

*उच्च न्यायालयाचा मान राखून विधिवत पूजन
*२४ नोव्हेंबरला शरयू नदी तिरावर महाआरती
*२५ नोव्हेंबरला अयोध्येत उद्धव यांची जाहीर सभा
*खासदार संजय राऊत १२ नोव्हेंबरला अयोध्येत
*संत-महंतांच्या सल्ल्याने कार्यक्रमाची आखणी

अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या घोषणेचा प्रत्यक्ष मुहूर्त २४ नोव्हेंबरपासून साधला जाणार आहे. या दिवशी उध्दव यांच्या हस्ते शरयू नदीवर पूजन केले जाणार आहे. उध्दव ठाकरे यांचे हे मिशन पूर्ण करण्यासाठी अयोध्येतील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सेनेचे लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे रवाना होणार आहेत. राज्यभरातून सुमारे एक लाख शिवसैनिक या सोहळ्याला हजर राहणार आहेत, अशी माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली. राज्यातून अयोध्येत जाणार्‍या सैनिकांसाठी फैजाबाद, अयोध्या, कामियानी, गोंडा एक्स्प्रेस गाड्या बुक करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

राम मंदिराची उभारणी अयोध्येत करण्याची घोषणा करूनही विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांना त्याची कृती करता आली नाही. बाबरी मशीद उध्द्वस्त करण्यात आली तेव्हा शिवसेना वगळून सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनांनी पळपुटी भूमिका घेतली होती. विशेष म्हणजे भाजपनेही राम मंदिर उभारणीच्या घोषणेपासून पळ काढत बचावात्मक पवित्रा घेतला होता. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने राममंदिर उभारण्याची घोषणा केली. याच घोषणेचा आधार घेत भाजप सत्तेवर आला. पण सत्तेतील पाच वर्षे पूर्ण होत असताना त्या पक्षाला राम मंदिराच्या उभारणीची एक वीटही रचता आली नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीची घोषणा करत भाजपला चांगलाच धडा शिकवला आहे. इतकेच नव्हे तर भाजपचे उघड समर्थन करणार्‍या हिंदुतत्वादी संघटनांनाही आत्मपरीक्षण करायला लावले. सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत शिवाजी पार्क येथे आयोजित दसरा मेळाव्यात राम मंदिर उभारणीची घोषणा केली आणि नोव्हेंबरमध्ये यासाठी अयोध्येत जाण्याचा इरादा जाहीर करून टाकला.

उध्दव यांच्या या घोषणेने देशभर एकच खळबळ उडाली. महत्वाचे म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या घोषणेनंतर सर्वाधिक अडचण झाली ती भारतीय जनता पक्षाची. त्या पक्षाने हिंदुत्ववादी संघटनांचा आधार घेत हा मुद्दा पुन्हा हाती घेण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याआधीच उध्दव ठाकरे यांनी आपल्या अयोध्येतील नियोजित कार्यक्रमाची घोषणा केली आणि आता २४ नोव्हेंबर या दिवशी ते शरयू नदीच्या तिरावर राममंदिराच्या नियोजित वास्तूच्या जागेवर पूजन करतील. यानंतर २५ तारखेला अयोध्येत उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. उध्दव यांच्या या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन केले. तिथे लोकांशी चर्चा केली आणि दोन दिवसांचा नियोजनबध्द कार्यक्रम आखण्यात आला. २४ नोव्हेंबरला अयोध्येत पोहोचताच सायंकाळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीच्या पात्रावर महाआरती होईल. त्यानंतर याच नदीच्या पात्रावर पूजन करतील. पूजन झाल्यावर राम मंदिर उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिले त्या कारसेवकाना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.

- Advertisement -

तयारीसाठी संजय राऊत सोमवारी अयोध्येत

या सार्‍या कार्यक्रमाची आखणी याआधीच खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत जाऊन केली असली तरी उध्दव यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमास रितसर परवानग्या घेण्यासाठी पुन्हा येत्या सोमवारी १२ तारखेला राऊत अयोध्येला जाणार आहेत. पोलीस परवानग्यांशिवाय जिल्हाधिकारी यंत्रणांची संमती घेण्याचे काम राऊत या भेटीत करणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय शरयू नदीच्या किनारी करायच्या महाआरतीबरोबरच जाहीर सभेचीही आखणी खासदार राऊत यांच्यासोबत जाणारे काही विभागप्रमुख आणि आमदार करणार आहेत.

शरयू नदीच का?

अयोध्येत कारसेवकांचा बाबरी मशीद पाडण्याचा डाव उधळून लावण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मुलायम सिंग सरकारने सारी तयारी केली होती. अयोध्येत जाणार्‍या कारसेवकांना याच शरयू नदीवर रोखण्यात आले होते. गर्दीची तीव्रता वाढत होती आणि पोलीस हतबल झाले होते. कारसेवकांची गर्दी पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना गोळीबाराचा वापर करावा लागला. या गोळीबारात असंख्य कारसेवक मृत्यूमुखी पडले. याच कारसेवकांना श्रध्दांजलीचा कार्यक्रम उध्दव यांच्या उपस्थितीत होणार आहे.

न्यायालयाचाही आदर करणार

राम मंदिर उभारणीचा कार्यक्रम हाती घेताना हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाच्या आजवरच्या निर्देशाचे पालन केले जाणार आहे. यामुळेच प्रत्यक्ष मंदिर उभारणीऐवजी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शरयू नदीच्या पात्रावर पूजन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. जनरेट्याचा आदर राखून न्यायालयाकडून लवकरच निर्णय येईल, असे सेनेचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -