घरताज्या घडामोडीमैफल सादर करताना अस्वस्थ वाटले, तरीही केले गायन 

मैफल सादर करताना अस्वस्थ वाटले, तरीही केले गायन 

Subscribe

रसिकांना भावगितांची गोडी लावणाऱ्या विनायक जोशी यांचे निधन 

रसिकांना मराठी भावगीतांची गोडी लावणारे गायक म्हणून ख्याती असणारे विनायक जोशी यांनी शनिवारी जगाचा निरोप घेतला. पण हा निरोप अनेक वर्षे रसिकांना आठवणीत राहणारा असा असणार आहे. आपल्या शेवटच्या ठरलेल्या गायनाच्या कार्यक्रमातही त्यांनी रसिकांसमोर एक मोठा आदर्शच ठेवला आहे. इंदूर येथे श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांचा गायनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमादरम्यान गातानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पण त्यांनी गाणे मात्र अर्धवट सोडले नाही. संपुर्ण कार्यक्रमात त्रास होत असतानाही त्यांनी हा कार्यक्रम पुर्ण केला.

इंदूरचा कार्यक्रम संपवून ते डोंबिवलीला परतत असताना त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना धुळ्यातील सिव्हिल रूग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. ते ५९ वर्षांचे होते.  त्यांच्या पश्चात पत्नी पूर्णिमा, मुलगा गंधार आणि सून गेयश्री असे कुटुंब आहे. भावगितांचे निस्सिम प्रेमी, विविध संगीत प्रकाराचे अभ्यासक, आणि सार्वजनिक कार्यात सक्रीय सहभाग घेणारे म्हणून ते परिचित होते. विनायक जोशी यांनी शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. ए के अभ्यंकर यांच्याकडे घेतले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांच्या सुगम संगीताचे त्यांनी शिक्षण घेतले. गजल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

असंख्य सांगितिक कार्यक्रमांचे संकल्पक 

सरीवर सरी, स्वरयात्रा, बाबुल मोरा, गीत नवे गाईन मी, तीन बेगम आणि एक बादशहा यासारख्या सांगितिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भावगितांकडे रसिक वळवण्यासाठी त्यांचे योगदान हे नेहमीच उल्लेखनीय असे आहे. त्यांचा वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गाण्यांवर बेतलेला वसंत बहार हा कार्यक्रमदेखील लोकप्रिय होता. गझलकार संदीप गुप्ते यांच्या गझलांवर आधारीत जरा सी प्यास, खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या निवेदनासह सूर नभांगणाचे, स्वरतीर्थसाठी आयोजित भाभी की चूडिया, वसंत आजगावकर – मधुकर जोशी यांच्या गीतांना ५० वर्षे झाल्यानिमित्त करात माझ्या वाजे कंकण हे त्यांचे कार्यक्रमही लोकप्रिय झाले.

आदर्श डोंबिवलीकराचे एक्झिट

अमेरिकेतील न्यू जर्सी व रिचमंड येथील सोलो कार्यक्रम, दिल्ली जालंधर जम्मू येथील सैगल गीतांवरचे कार्यक्रम त्यांनी सादर केले. गेल्याच वर्षी त्यांना आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. विनायक जोशी हे बॅंक ऑफ इंडियात नोकरी करत होते. ते येत्या काही महिन्यातच निवृत्त होणार होते. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती प्रतिष्ठानचे जेष्ठ कार्यकर्ते होते. किरण जोगळेकर यांच्या निधनानंतर जोशी यांनी चतुरंग प्रतिष्ठान, डोंबिवली या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यामुळे या संस्थेला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – आज राष्ट्रवादीची बैठक शरद पवार करणार मार्गदर्शन 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.

एक प्रतिक्रिया

  1. “आपल्या शेवटच्या ठरलेल्या गायनाच्या कार्यक्रमातही त्यांनी रसिकांसमोर एक मोठा आदर्शच ठेवला आहे..”
    असे या लेखात खूप मुर्खासारखे आणि चुकीचे लिहिले आहे.

    जेव्हा खूप अस्वस्थ वाटत होते तेव्हा कार्यक्रम थांबवून जवळच्या रुंग्णालयात तपासणी केली असती तर हा काळाचा घाला कदाचित टळला असता.
    जीव वाचला असता आणि कलेची साधना व रसिकांची गायनातून सेवा पुढे चालू राहिली असती.

    खरंतर कलाकारांनी आपल्या दगदगीकन्या आणि ताणतणावाच्या आयुष्यात सर्वप्रथम स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
    थोडी जरी शंका आली किंवा अस्वस्थता जाणवली तर सर्वप्रथम ताबडतोब लक्ष देऊन उपाय केले पाहिजेत. त्यातून काही निघाले नाही तर उत्तमच.

    तुम्ही लेखात काहीतरी लिहून कलाकारांना “चुकीचे वागणे हे आदर्श” म्हणून पुढे ठेवू नका.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -