घरमुंबईरस्ते प्रकल्पासाठी झाडांची कत्तल

रस्ते प्रकल्पासाठी झाडांची कत्तल

Subscribe

५ ते १५० वर्ष वयापर्यंतच्या झाडांचा समावेश

एकीकडे शतकोटी वृक्ष लागवड मोहीमेत दरवर्षी लाखो नव्या वृक्षांंची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना दुसरीकडे विकासाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची कत्तल करून या मोहीमेला हरताळ फासला जात आहे.शहापूर तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या एन्युईटी हायब्रीड कार्यक्रमांतर्गत रस्ते प्रकल्पामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या प्रकल्पांतर्गत तालुक्यातील ४ प्रमुख ग्रामीण मार्गांवर रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या हजारो झाडांची कत्तल सुरु असून शहापूर-डोळखांब-चोंढे व शेणवे-किन्हवली-सरळगाव या दोन मार्गांवरील सुमारे १३२४ झाडांचा बळी या प्रकल्पाने घेतला आहे.

मराठवाड्यात यशस्वी झालेला एन्युईटी हायब्रीड रस्त्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सुरु आहे. त्याअंतर्गत शहापूर-डोळखांब-चोंढे हा ३५ किलोमिटरचा रस्ता, कसारा-वाशाळा-डोळखांब–पांढरीचापाडा-शिरोशी-टोकावडे-म्हसा हा ९० किलोमिटरचा मार्ग, शेणवे-किन्हवली-सरळगाव–देहरी हा ३०किलोमिटरचा रस्ता, कांबारे-पिवळी-वासिंद हा २३ किलोमिटर रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.मात्र रुंदीकरण करत असतांना या चारही मार्गांवर अंदाजे पाच हजारांहून अधिक झाडांची कत्तल होणार असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. सध्या शहापूर-डोळखांब-चोंढे व शेणवे-किन्हवली-सरळगाव मार्गांचे काम प्रगतीपथावर असून या दोन्ही मार्गांत रुंदीकरणात आड येणारी १ हजार ३२४ हिरवीगार झाडे मुळासकट काढून टाकण्याचे काम गेल्या ५ दिवसांपासून सुरु आहे. मात्र वनविभागाने दिलेल्या परवानगी व्यतिरिक्त न नोंद नसलेली बरीचशी लहान-मोठी झाडेही तोडली जात असून वृक्षतोडीचा प्रत्यक्ष आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सुमारे शंभर-दिडशे वर्षे जुने वृक्षही या रुंदीकरणात नामशेष होत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

अनिस इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीने नेमलेले पोटठेकेदार सध्या ही वृक्षतोड करत आहेत. ब-याच ठिकाणी कापलेली झाडे रस्त्याच्या कडेलाच ठेवली जात असल्याने, बुंधे न कापल्याने वाहतूकीत अडथळा बनत आहेत. तोडण्याची परवानगी मिळालेली ही झाडे खाजगी मालकीचीच असून शिलोत्तर-शेणवे आणि शेणवे-डोळखांब दरम्यान असणारी वनविभागाच्या मालकीची झाडे तोडण्याची परवानगी येणे अद्याप बाकी असल्याची माहिती शहापूर वनविभागाकडून मिळाली. दरम्यान हजारो झाडांची कत्तल झाल्याने होणारी वनसंपदेची हानी भरुन काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग व ठेकेदार कंपनी यांनी येत्या पावसाळ्यात दुप्पट झाडे लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी सह्याद्री वनसंवर्धन संस्था, निसर्गप्रेमी नागरिकानी केली आहे. मात्र ठेकेदार कंपनी वृक्षतोडीबाबत माहिती लपविण्याचा प्रयत्न करत असून तोडलेली झाडे बाजूला करणेकामी दिरंगाई करत असल्याचा आरोप होत आहे.

तोडलेल्या झाडांच्या बदल्यात सार्वजनिक बांधकाम विभाग सुमारे २० हजार नवी झाडे लावणार आहे. त्यांचे संवर्धन करणार आहे. त्या अटीवरच अडथळा ठरणारी झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. “
संदिप तोरडमल, वनपरिक्षेत्र अधिकारी, धसई, शहापूर

- Advertisement -

या रस्ता रुंदीकरणात 1300 झाडे तोडण्यात येत असल्याची परवानगी मिळाली आहे.परंतु प्रत्यक्षात जास्त झाडे तोडली जाणार आहेत.20 हजार झाडे लावली जाणार असतील तर ही आनंदाची बाब आहे.परंतु या झाडांचे संवर्धन करण्यासाठी ही कंपनी पुढे येईल का?की फक्त निसर्ग प्रेमींचा रोष ओढवू नये म्हणून दाखवलेले गाजर आहे.नवीन लावलेल्या झाडांचे संवर्धन 10 वर्ष कंपनीने करावे.अशी मागणी वनविभागाकडे करण्यात येणार आहे.              सुनील वेखंडे सचिव सह्याद्री वनसंवर्धन संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -