घरमुंबईएसटीच्या तक्रार पुस्तिका कोर्‍याच

एसटीच्या तक्रार पुस्तिका कोर्‍याच

Subscribe

प्रवाशी पुस्तिकेपासून अनभिज्ञ, 23 लाखांच्या पुस्तिका गायब

एसटी प्रवासात प्रवाशांना सामना कराव्या लागणार्‍या समस्यांची प्रवाशांना तक्रार करता यावी यासाठी एसटी महामंडळाने अनेक वर्षांपूर्वी 23 लाख 80 हजार रुपये खर्च करुन 34 हजार वाहकांकडे तक्रार पुस्तिका दिली आहे. मात्र पुस्तिकेची माहिती प्रवाशांना देण्यातच न आल्याने सर्वच तक्रार पुस्तिका कोर्‍याच राहिल्या आहेत. तसेच या पुस्तिकेबाबत एसटी महामंडळालाही गांभीर्य नसल्याने अनेक वाहकांकडे तक्रार पुस्तिकाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एसटी स्वच्छ नाही, एसटी वेळेत सुटली नाही, वाहक उद्धट वागतो, चालक मोबाईलवर बोलत गाडी चालवत आहे, अशा एसटीतील सुविधा किंवा कर्मचार्‍यांच्या तक्रारी प्रवाशांना करता याव्यात यासाठी एसटी महामंडळाने आपल्या वाहकाकडे तक्रार पुस्तिका दिली आहे. परंतु अशी तक्रार पुस्तिका वाहकाकडे असते याची माहिती प्रवाशांना न देण्यात आल्यामुळे माहीत नसल्यामुळे प्रवासातील असुविधांबद्दलची तक्रार नेमकी कुठे करावी हेच प्रवाशांना कळत नाही. त्यामुळे वाहकाची तक्रार पुस्तिका नेहमीच कोरी राहते.

- Advertisement -

अर्थात याचा एसटी प्रशासनाला सार्थ अभिमान वाटत असला तरी, अशा ‘बेमालुम’ पणामुळे एसटीने प्रवाशांसाठी तक्रारीचे दालन बंद करून, त्यातून सुधारणा करण्याच्या संधीलाच पूर्णविराम दिला आहे. राज्यात एसटीच्या 18 हजार 500 बस गाडयाच्या ताफा आहे. सध्या एसटीत सुमारे 34 हजार वाहक काम करतात. प्रत्येकवेळी आपल्या ड्युटीवर जाताना त्या वाहकाकडे एक तक्रार पुस्तिका दिली जाते. ही तक्रार पुस्तिकांची किंमत 70 रुपये आहे. एसटी महामंडळाने 23 लाख 80 हजार रुपये खर्च करुन 34 हजार वाहकाकडेही तक्रार पुस्तिका दिली.

प्रवाशांना वाहकाकडे तक्रार पुस्तिक न मिळाल्यास त्यांनी वाहकांची आगार प्रमुखाकडे तक्रार करावी.
– राहुल तोरो, वाहतूक व्यवस्थापक, एसटी महामंडळ

- Advertisement -

कशी केली जाते कारवाई
प्रवाशांनी वाहकाकडील तक्रार पुस्तिकेत तक्रार केल्यानंतर वाहकाने ड्युटी संपताना आगारातील स्थानक प्रमुखांकडे तक्रार पुस्तिका जमा करायची असते. स्थानक प्रमुखांनी पुस्तिकेतील तक्रारीची शहानिशा करून संबंधित प्रवाशाने दिलेल्या पत्यावर केलेल्या कारवाईचा तपशिल पाठवणे बंधनकारक असते.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ घोषवाक्याला हरताळ
एसटीच्या प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. परंतु अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने या योजनेला हरताळ फासत तक्रार पुस्तिका कोरी ठेवण्याचे कौशल्य प्रशासनाने प्राप्त केले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे घोषवाक्य मिरवणार्‍या एसटीला आपल्या प्रवासी सेवेचा दर्जा सुधारायचा नसेल, तर अशा तक्रार पुस्तिका कोर्‍या राहणे हेच श्रेयस्कर ठरेल.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -