घरमुंबईमुंबईला ग्रहण,डोंगरीत इमारत कोसळली

मुंबईला ग्रहण,डोंगरीत इमारत कोसळली

Subscribe

९ जण जखमी,कोसळलेली इमारत अनधिकृतच

मुंबई हे दुर्घटनांचे शहर बनले आहे. कधी खड्डयांमुळे, तर झाड पडून तर कधी नाल्यात आणि गटारात पडून तर कधी मॅनहोल्समध्ये पडून लोकांचे बळी जात आहे. त्यात बुधवारी डोंगरीतील केसरबाई ‘बी’इमारत दुर्घटना होवून १० जणांचे बळी गेले आहेत. तर ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहे.मुंबईत पावलोपावली दुर्घटना घडत असून पोर्णिमेच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्यामुळे मुंबईला ग्रहण लागले आहे. कोसळलेली केसरबाई ‘बी’ ही इमारत अनधिकृत असल्याचे म्हाडाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

डोंगरी येथील निशाणपाडा क्रॉस रोडवरील तांडेल स्ट्रीटवरील चार मजली केसरबाई इमारतीचे बांधकाम मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पत्त्यासारखे कोसळले आणि इमारतीतील वरच्या मजल्यावरील रहिवाशी तसेच तळ मजल्यावरील कारखान्यातील कामगार त्यात गाडले गेले. केसरभाई ही इमारत म्हाडाची उपकर प्राप्त इमारत असून २०१७ मध्ये महापालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून नोटीस बजावली होती. ही इमारत बाई हिराबाई रहिमभाई आलू पारु आणि केसरबाई धरमसी खाकू चॅरिटेबल आणि रिलिजस ट्रस्टच्या मालकीची आहे.

- Advertisement -

केसरबाई ‘बी’ ही इमारत धोकादायक म्हणून आधीच जाहीर केलेली होते.त्यामुळे या इमारतीतील काही भाडेकरू आधीच घर सोडून गेले होते. त्यामुळे पहिल्या मजल्यावर आणि तळ मजल्यावर यापैकी मूळ कुटुंबे राहत होती. या काही रिकाम्या घरांमध्ये भाडेकरू राहत होते.मंगळवारी दुर्घटना झाल्यानंतर ही सर्व कुटुंबे ढिगार्‍याखाली गाडली. तर या दुर्घटनेमुळे जोडल्या गेलेल्या केसरबाई ‘सी’इमारतही धोकादायक ठरल्याने तात्काळ रिक्त करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास इमारत दुर्घटनेची वर्दी मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका आणि रेस्क्यू व्हॅनसह ८ फायर इंजिन, कंट्ोल पोस्ट आदींसहअग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ३ क्रमांकाची वर्दी देत एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे आणि बी विभागाचे सहायक आयुक्त विवेक राही यांच्या मार्गदर्शनाखाली उपअग्निशमन अधिकारी, इतर अग्निशमन अधिकारी, ५५ महापालिका कामगार, १०४ खासगी स्वयंसेवी संस्थांचे कामगार, एनडीआरएफचे ९९ जवान आदींच्या मदतीने मदतकार्य राबवले.

- Advertisement -

इमारतीचा परिसर चिंचोळा असल्याने जेसीबीसह अन्य यंत्र घटनास्थळापर्यंत पोहोचू न शकल्यामुळे मनुष्यबळाचा वापर करत अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न केले. त्यांनी ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. रात्रीपर्यंत एकूण १९ जणांना ढिगार्‍याखालून बाहेर काढून जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील५ महिला व एका बालकासह१० जणांना मृत घोषित करण्यात आले.तर ९ जण जखमी झाले असून त्यांच्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यासंदर्भात महापालिकेने ७ ऑगस्ट २०१७ रोजी म्हाडा, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहिले होते. केसरबाई बिल्डींग इमारत अतिधोकादायक अर्थात सी- वन प्रवर्गात मोडत असल्याने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे. तसेच याबाबतचा स्ट्रक्चरल अहवाल महापालिकेला सादर करण्यात यावा.तरीही याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्यास याची जबाबदारी आपल्यावर राहिल,असा इशारा महापालिकेने दिला होता. तसेच जानेवारी २०१९मध्ये या इमारतींच्या वरच्या मजल्यावरील काही भाग कोसळत असल्याने म्हाडाच्या दुरुस्ती मंडळानेही इमारतीला नोटीस बजावून सुरक्षित बॅरेकेट्स उभारुन तो भाग पाडून टाकण्यात यावा,अशासूचना केल्या होता. परंतु यासर्व नोटीसांकडे म्हाडाच्या दुरुस्ती मंडळ व रहिवाशांनी दुर्लक्ष केले आणि याचा पाठपुरावा करण्यास महापालिकेच्या बी- विभागाचे अधिकारी अपयशी ठरल्याने यासर्वांच्या निष्काळजीपणाचे बळी या इमारत दुर्घटनेत गेल्याचे बोलले जात आहेत.

केसरबाई सी इमारत केली रिकामी
दुर्घटनाग्रस्त केसरबाई बी इमारतीला जोडूनच केसरबाई सी इमारत होती. परंतु बी इमारतीचा भाग कोसळल्याने सी इमारतीच्या बांधकामाला तडे गेले. केसरबाई सी इमारतीत एकूण ५४ रहिवाशी राहत होते. सी इमारत अधिकृत असून दुर्घटना झालेली बी इमारत ही पूर्वी बैठी चाळ होती. चार बैठ्या घरांच्या जागेवर चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आली. १९९०मध्ये केसरबाई बी इमारतीचे बांधकाम केले होते. त्यामुळे ही इमारतच अनधिकृत असल्याचे बोलले जात आहे. या इमारतीचा पुनर्विकास प्रकल्पाबाबतची चर्चा सुरु होती,असे रहिवाशांचे म्हणणे होते.

पुनर्विकासाच्या दिरंगाईची चौकशी-मुख्यमंत्री
ही इमारत शंभर वर्षे जुनी आहे, त्यामुळे धोकादायक म्हणून घोषित केली होती. तिच्या पुनर्विकासाचे काम विकासकाकडे दिले होते. पण त्यामध्ये दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. बचाव व मदत कार्यानंतर दुर्घटनेची चौकशी आणि अन्य आवश्यक बाबींवर निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.बीपीटीच्या जागेवर संक्रमण शिबिर बांधून पुनर्विकास करावा -आ.अमिन पटेल

डोंगरी विभागात अशा अनेक इमारती आहेत, ज्या धोकादायक अवस्थेत आहेत. या इमारतींची पुनर्दुरुस्ती करण्यात यावी तसेच बीपीटीच्या जागेवर संक्रमण शिबिर बांधून त्या इमारतीतील लोकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी स्थानिक काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी केली आहे.

मनुष्यवधचा गुन्हा दाखल करा-मुंबई काँग्रेस
या इमारत दुर्घटनेला मुंबई महापालिका, म्हाडा आणि शिवसेना भाजप सरकारचे दुर्लक्ष व निष्काळजीपणा सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसने केला आहे. संबंधित दोषी महापालिका व म्हाडाच्या अधिकार्‍यांवर ३०२ कलमांतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.

म्हाडासह पदनिर्देशित अधिकार्‍यांवर कारवाई करा-यशवंत जाधव
केसरबाई ही इमारत जुनी असून पूर्वी तेथे तळ मजल्यावरील चार खोल्यांचे बांधकाम होते. परंतु १९९० मध्ये या तळमजल्याची पुनर्बांधणी करत चार मजले चढवण्यात आले. म्हाडाची परवानगी घेवून हे बांधकाम करण्यात आले असले तरी बांधकाम योग्यप्रकारे नसल्याने ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे महापालिकेने केवळ नोटीस देवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी याला महापालिकेचे अधिकारीच जबाबदार आहेत. महापालिकेच्या संबंधित पदनिर्देशित अधिकार्‍यांसह अभियंत्यावर त्वरीत कारवाई केली जावी,अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले.

इमारत दुर्घटनेनंतर बाधितांच्या तात्पुरत्या आश्रयाकरता बी विभागातील इमामवाडा महापालिका शाळा उघडण्यात आली . तसेच काही नागरिकांना तात्पुरता आश्रय जवळच्या मदरसा व दर्ग्यात घेतला होता. त्यामुळे खासगी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांना खाण्याची पाकीटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मृत्युमुखी पडलेले रहिवाशी
साबीया नसीर शेख(60), अब्दुल सतार कालू शेख (५५), मुझामिल मनसुर सलमानी (१५), सायरा रिहान शेख (२०), जावेद इस्माईल(३४), अरहान शेहजाद (४०),कश्यप्पा अमिराजान (१३) सना सलमानी(२५), झुबेर मन्सुर सलमानी (२०),इब्राहिम (दीड वर्षे)

जखमी झालेले रहिवाशी
फिरोज सलमाना (४५), झीनत रहेमान (३०), आयेश शेख (४), अब्दुल रेहमान(३), नावेद सलमान(३0), इम्रान हुसेन कलवानी (३0), सलमान अब्दुल शेख(४५), जावेद इस्माईल (३४), साजीदा शहजाद जरीवाला (५८)
,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -