राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे; संजय राऊतांची भाजपवर टीका

राज्यात मंदिरे खुली करावी यासाठी गेल्या आठवड्यात मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून राजकीय विश्लेषकांसह अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या मुद्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून भाजपावर सडकून टीका केली आहे. राज्यात पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत 

जेथे भाजपाचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे, असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्यांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही प्रमुख लोकांना वाटते. प. बंगालात एका भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या झाली हे दुर्दैव, पण त्याविरोधांत हजारो भाजपा कार्यकर्त्यांना जमवून कोलकात्यातील मंत्रालयावर चाल करण्यात आली. यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व त्याचा राजकीय फायदा विधानसभा निवडणुकांत घेता येईल हे भाजपाचे राजकीय धोरण ठीक, पण प. बंगाल हा हिंदुस्थानचाच एक भाग आहे हे केंद्राला विसरता येणार नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही डोळ्यात खुपते व सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांना देशविरोधी वाटतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार डिसेंबरपर्यंत बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लादली जाईल, असे भविष्य प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवून ठेवले. त्याआधी प्रमुख नेत्यांना ‘निपट डालो’ हे धोरण अमलात आणायचे. मुळात दिल्लीतील राज्यकर्त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, एखाद्या राज्यात भाजपाविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

फडणविसांच्या खुर्चीला दणका देणाऱ्या पावसातील ‘त्या’ ऐतिहासिक सभेची वर्षपूर्ती!