‘वाडिया हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही’, शर्मिला ठाकरे आक्रमक!

Mumbai

मुंबईतील परळ येथील बाई जेरबाई वाडियाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून तीन दिवस धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वाडिया हॉस्पिटलमधील कर्मचारी व लाल बावटा जनरल कामगार युनियन अनेक मागण्यांसाठी लाल बावटा कामगार युनियनचे अध्यक्ष मधुकर परब व जनरल सेक्रेटरी प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आता मनसेनेही सहभाग घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिलीताई ठाकरे आणि मनसेचे जेष्ठ नेते बाळ नांदगावर यांनी आज आंदोलनात सहभाग घेत आपली भुमिका स्पष्ट केली.

‘वाडिया बंद होणार नाही. कर्माचाऱ्यांपेक्षा इथे येणारे रूग्ण जास्त महत्त्वाचं आहे. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या त्यांचे मुल वाडियात अॅडमिट होते आणि ते गेले. तेव्हापासून गेले १५ दिवस आम्ही या गोष्टीचा पाठपुरवठा करत आहोत. सीईओ ना भेटलो, महापालिकेत पडवळ यांना जाऊन भेटलो पण काहीच मार्ग न निघाल्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आता लवकरात लवकर आजित दादांना जाऊन भेटणार आणि वाडियासाठी अनुदान लवकरात लवकर द्या अशी मागणी करणार असल्याचे शर्मिला ठाकरे म्हणाल्या’.

वाडिया बाल रुग्णालयाचे मागील तीन वर्षांपासून ९६ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. या अनुदानाची रक्कमही महापालिकेने दिलेले नाही, तसेच सरकारकडूनही कोट्यवधी रुपयांची अनुदानाची रक्कम थकीत आहे. महापालिका आणि सरकारकडे अनुदान थकीत असल्याने रुग्णालय चालवणे आता व्यवस्थापनाला कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे हे रुग्णालय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी समितीच्या बैठकीत केला होता.

महापौरांसह अधिकारी वाडियाला विसरले

वाडिया रुग्णालयाला १३ कोटी रुपये देवून रुग्णालय बंद होण्यापासून वाचवल्याच्या गमजा ठोकत महापौरांसह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी प्रसिध्दी मिळवली. परंतु १३ कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर पुढील थकीत रकमेबाबत तसेच कायमस्वरुपी तोडगा काढण्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठक महापौरांच्या स्तरावर झालेली नाही. महापौरांसह महापालिकेचे अधिकारी वाडियाच्या या मुद्याबाबत कोणताही तोडगा न काढल्यामुळेच रुग्णालय बंद करण्याच्या हालचाली पुन्हा सुरु होऊ लागल्या आहेत, अशी चर्चा आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here