विहार, तुळशी, पवई तलाव भरल्यानंतरच ‘मिठी’चा धोका

तिन्ही तलाव भरल्यानंतर त्यातील पाणी ‘मिठी’मध्ये न सोडता आता थेट भांडुप कॉम्प्लेक्स येथे भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये जमा करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.

Mumbai
मिठी नदी

मुंबईत सध्या मिठी नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आल्यानंतरही या मिठीची पूररेषा आता बदलत चालली आहे. मिठीमुळे वांद्र्यासह अनेक भागांमध्ये पाणी तुंबत असून पाण्याचा निचरा होण्यासही अडचण येत आहे. मात्र, विहार, तुळशी तसेच पवई तलाव भरल्यानंतरच ‘मिठी’च्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास अडथळा येतो. परिणामी मुंबईतील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून तिन्ही तलाव भरल्यानंतर त्यातील पाणी ‘मिठी’मध्ये न सोडता आता थेट भांडुप कॉम्प्लेक्स येथे भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये जमा करण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे.

साचलेल्या पाण्याचा फटका ठाकरे कुटुंबीयांनाही

मुंबईमध्ये मागील बुधवारी ‘मिठी’ नदीच्या पाण्याने पूररेषा पार केल्यामुळे वांद्र्यासह कुर्ला एलबीएस तसेच बामनदाया पाड्यांमध्ये पाणी जमा झाले. समुद्राला भरती आल्याने तसेच ‘मिठी’चे पाणी मागे फिरुन अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. मात्र पंप लावूनही पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागत होता. ‘मातोश्री’ परिसरातही बुधवारी पाणी तुंबले आणि याचा फटका ठाकरे कुटुंबाला बसला. पाणी तुंबल्याने खुद्द युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना आपल्या वाहनातून उतरून चालत जावे लागले.

हेही वाचा – रे रोड स्थानकांवरून जाणारा पूल वाकला; काही दिवसांसाठी वाहतूक बंद

महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने होणार अभ्यास

मिठी नदीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या मागणीनुसार, महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सोमवारी तातडीने अतिरिक्त आयुक्त, सर्व सहायक आयुक्त, जलअभियंता, आपत्कालिन विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच पर्जन्य जल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यावर चर्चा केली. यावेळी पर्जन्य जलविभागाचे अधिकारी, विभागांचे सहायक आयुक्त तसेच आपत्कालिन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहार, तुळशी आणि पवई तलाव भरल्याने त्यातील पाणी मिठी नदीत येत असल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे निरिक्षण नोंदवले. त्यानुसार आयुक्तांनी जलअभियंत्यांना सूचना करून तुळशी, विहार आणि पवई तलाव भरल्याने ओसंडून वाहणारे पाणी मिठी नदीत न सोडता, ते भांडुप कॉम्प्लेक्समध्ये भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये कशाप्रकारे वळवता येईल आणि त्याचा कशाप्रकारे वापर करता येईल, याचा अभ्यास करण्यास सांगितल्याचे समजते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रकल्प प्रविण दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही तलावांचे पाणी ओसंडून वाहणारे पाणी भांडुप कॉम्प्लेक्स येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये भूमिगत जलाशय बांधण्याचा अभ्यास केला जाणार आहे.