घरमुंबईमुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव तर ठाणे मनपात नरेश म्हस्केंची वर्णी

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव तर ठाणे मनपात नरेश म्हस्केंची वर्णी

Subscribe

मुंबई आणि ठाणे महापौरपदी शिवसेनेकडून या दोन नेत्यांच्या नावाची लवकरच घोषणा....

राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली. मुंबईसह आठ महत्त्वाच्या महानगरपालिकांचा महापौर खुल्या वर्गातून निवडला जाणार आहे. मुंबई आणि ठाणे या दोन्ही महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेकडून यशवंत जाधव तर ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी नरेश म्हस्के यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. थोड्याच वेळात शिवसेनेकडून या दोघांच्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत.

कोण आहेत यशवंत जाधव

मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले यशवंत जाधव हे तिन टर्म पासून नगरसेवक आहेत. याआधी जाधव यांचा २००२ साली तर त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांचा २०१४ साली महापौर बनण्याची संधी थोडक्यात हुकली होती. दोन्ही वेळेला अनुसूचित जातीसाठी आरक्षण पडले असताना जाधव दाम्पत्याला संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे यावेळेला खुल्या वर्गाचे आरक्षण असताना देखील जाधव यांना महापौरपद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यशवंत जाधव यांनी आतापर्यंत बाजार समितीचे आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. आधी गटनेते आणि २०१७ साली त्यांची सभागृह नेतेपदी निवड झाली होती. २०१८ साली त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

- Advertisement -

कोण आहेत नरेश म्हस्के

ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी नरेश म्हस्के यांचे नाव निश्चित झाले आहे. नरेश म्हस्के यांची ठाण्यातील कट्टर शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थक अशी ओळख आहे. भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या मतदारसंघातून यावेळी नरेश म्हस्के यांना संधी मिळणार, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र युती झाल्यामुळे म्हस्के यांची विधानसभेत जाण्याची संधी हुकली. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्याआधीच ठाणे मनपा महापौर पदासाठी खुल्या वर्गाचे आरक्षण पडल्यामुळे नरेश म्हस्के यांचा महापौरपदाचा रस्ता मोकळा झाला आहे.

नरेश म्हस्के सध्या ठाणे मनपातील पक्षाचे सभागृह नेते आहेत. विद्यार्थी सेनेपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. मनपा सभागृहात विरोधकांना एकत्र घेऊन काम करण्यात त्यांचा चांगलाच हातखंडा आहे, असे सांगितले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -