विराट लवकरच रिचर्ड्सला मागे टाकेल

वॉर्नच्या मते विराट सर्वोत्तम वनडे फलंदाज होण्याच्या मार्गावर

Mumbai
Shane Warne

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. खासकरून कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमधील प्रदर्शन फारच अफलातून आहे. त्याने अवघ्या २२७ सामन्यांत ४१ शतके केली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो दुसर्‍या स्थानी आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच तो सध्याच्या घडीला सर्वोत्तम फलंदाज आहेच, मात्र तो वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हीव्ह रिचर्ड्स यांना मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज होण्याच्या मार्गावर आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नने विराटचे कौतुक केले आहे.

विराट कोहली उत्कृष्ट खेळाडू आहे. सर डॉन ब्रॅडमन हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज आहेत, हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्यानंतर कोणता फलंदाज सर्वोत्तम आहे, हे सांगता येणे जरा कठीण आहे. सर व्हिवीअन रिचर्ड्स हे मी स्वतः पाहिलेले सर्वोत्तम फलंदाज आहेत. मला वाटत नाही की मी त्यांच्यापेक्षा चांगला फलंदाज बघितला आहे. मी विराटला खेळताना पाहत आहे आणि त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी त्याला गोलंदाजीही केली आहे. माझ्या मते विराट सध्या रिचर्ड्स यांना मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज होण्याच्या मार्गावर आहे. रिचर्ड्स अप्रतिम फलंदाज होते. मात्र, विराट धावसंख्येचा पाठलाग करताना ज्या पद्धतीने धावा करतो, म्हणजे त्याने २४-२५ शतके ही धावसंख्येचा पाठलाग करताना केली आहेत आणि भारताने यातील बरेचसे सामने जिंकले आहेत, हे खूपच उल्लेखनीय आहे, असे वॉर्नने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here