घरक्रीडाटी-२० वर्ल्डकपच्या आयोजनासाठी आयसीसीने योग्य वेळेची वाट पाहावी!

टी-२० वर्ल्डकपच्या आयोजनासाठी आयसीसीने योग्य वेळेची वाट पाहावी!

Subscribe

सध्याच्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणे अवघड जाईल, असे मत पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने व्यक्त केले. तसेच हा विश्वचषक प्रेक्षकांविना होणे शक्य नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या स्पर्धेच्या आयोजनासाठी योग्य वेळेची वाट पाहावी असेही अक्रमला वाटते. यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात प्रवासावर निर्बंध घातल्यामुळे आयसीसी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. या स्पर्धेचा अंतिम निर्णय १० जूनला होणार्‍या आयसीसीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या परिस्थितीत टी-२० विश्वचषकाचे आयोजन अवघड आहे. तसेच रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना टी-२० विश्वचषक स्पर्धा घेणे ही कल्पनाही चुकीची आहे. जगभरातून लोक एकत्र येऊन आपापल्या संघांना पाठिंबा देतात, हीच तर विश्वचषकाची खरी मजा आहे. प्रेक्षकांमुळे एक उत्साही वातावरण तयार होते. त्यामुळे टी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये होऊ शकत नाही. आयसीसीने या स्पर्धेच्या आयोजनासाठी योग्य वेळेची वाट पाहावी. करोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर आणि घालण्यात आलेले निर्बंध उठल्यानंतर आपल्याला टी-२० विश्वचषक घेता येऊ शकेल, असे अक्रम म्हणाला.

- Advertisement -

करोनामुळे जवळपास दोन महिने क्रिकेट बंद आहे. परंतु, आता आयसीसीने पुन्हा क्रिकेट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आयसीसीने थुंकीला पर्याय दिला पाहिजे असे अक्रमला वाटते. चेंडूला तकाकी आणण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंदी घातली ही गोष्ट वेगवान गोलंदाजांना फारशी आवडली नसेल. घामाचा वापर करण्याला परवानगी आहे. परंतु, थुंकी आणि घाम यात खूप फरक आहे. गोलंदाज थुंकीचा वापर करून चेंडू चमकवतात आणि त्यानंतर आणखी थोडी मदत मिळावी म्हणून ते घाम वापरतात. जास्त घाम वापरल्यास चेंडू ओला होण्याची भीती असते. त्यामुळे आयसीसीला लवकरच काहीतरी पर्याय शोधून काढावा लागेल, असे अक्रमने नमूद केले.

यंदा वर्ल्डकप अशक्यच – जोन्स

यंदा ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणे अशक्यच आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांना वाटते. यंदा ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार नाही आणि यामागे बरीच कारणे आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बरीच कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे १६ संघांना आणि प्रत्येक संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ असे सर्व मिळून ३०-४० लोकांना ऑस्ट्रेलियात आणणे शक्य नाही. या स्पर्धेच्या आयोजकांना फारसा पैसाही मिळत नाही. तसेच ऑस्ट्रेलियात बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा या स्पर्धेचे आयोजन होऊ शकत नाही, असे जोन्स म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -