भारताच्या विजयात भुवनेश्वरची चमक

Mumbai
भुवनेश्वर कुमारची अप्रतिम गोलंदाजी

भुवनेश्वर कुमारची अप्रतिम गोलंदाजी आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा डकवर्थ-लुईस नियमानुसार ५९ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

भारताने दिलेल्या ५० षटकांत २८० धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचे सलामीवीर क्रिस गेल आणि इव्हन लुईस यांनी चांगली सुरुवात केली. खासकरून लुईसने आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे त्यांची ९ षटकांनंतर बिनबाद ४० अशी धावसंख्या होती. मात्र, पुढच्याच षटकात भुवनेश्वर गेल ११ धावांवर पायचीत पकडत ही जोडी फोडली. भरवशाच्या शाई होपला अवघ्या ५ धावांवर डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने माघारी पाठवले. याच (१२ व्या) षटकात पावसाला सुरुवात झाल्याने हा सामना ४६ षटकांचा करण्यात आला, ज्यात विंडीजला सामना जिंकण्यासाठी २७० धावांचे आव्हान मिळाले.

पुन्हा सामना सुरु झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरला कुलदीप यादवने बाद करत विंडीजला तिसरा झटका दिला. यानंतर लुईस आणि निकोलस पूरन यांनी दमदार फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. लुईसने ६६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, भुवनेश्वरने आपली जादू चालवत लुईसला ६५ धावांवर, तर पूरनला ४२ धावांवर माघारी पाठवत विंडीजला अडचणीत टाकले. यानंतर रॉस्टन चेस (१८), कर्णधार जेसन होल्डर (१३) आणि शेल्डन कॉटरेल (१७) यांनाच दुहेरी धावसंख्या करता आली. त्यामुळे विंडीजचा डाव ४२ व्या षटकात २१० धावांवर आटोपला.

त्याआधी भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली (१२०) आणि श्रेयस अय्यर (७१) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ७ बाद २७९ अशी धावसंख्या उभारली होती. या खेळीदरम्यान विराट विंडीजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.

संक्षिप्त धावफलक –

भारत : ५० षटकांत ७ बाद २७९ (विराट कोहली १२०, श्रेयस अय्यर ७१; कार्लोस ब्रेथवेट ३/५३) विजयी वि. वेस्ट इंडिज : ४२ षटकांत सर्वबाद २१० (इव्हन लुईस ६५, निकोलस पूरन ४२; भुवनेश्वर कुमार ४/३१, मोहम्मद शमी २/३९, कुलदीप यादव २/५९).