घरIPL 2020Mi vs RR: राजस्थानचा हल्लाबोल; स्टोक्सच्या शतकी वादळामुळे मुंबईचा मोठा पराभव

Mi vs RR: राजस्थानचा हल्लाबोल; स्टोक्सच्या शतकी वादळामुळे मुंबईचा मोठा पराभव

Subscribe

मुंबई इंडियन्सने दिलेले १९६ धावांचे तगडे आव्हान ११० चेंडूत पुर्ण करत राजस्थान रॉयल्सने ८ विकेट्स राखत मुंबईचा मोठा पराभव केला. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने तिसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भरभक्कम भागीदारी करत राजस्थानला सहज विजय मिळवून दिला. बेन स्टोक्सने मोसमातील पहिले शतक पुर्ण केले. ६० चेंडूत ३ षटकार आणि १४ चौकार ठोकून स्टोक्सने १०७ धावा लुटल्या. तर संजू सॅमसनने त्याला चांगली साथ देत ३१ चेंडूत ५४ धावा काढल्या. राजस्थानने आता गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

राजस्थानची सुरुवात तेवढी चांगली झाली नाही. रॉबिन उथप्पाने ताबडतोब फटकेबाजीचा प्रयत्न केला मात्र ११ चेंडूत १३ धावा करुन तो जेम्स पॅटिन्सनचा बळी ठरला. त्यानंतर आलेल्या कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र पॅटिन्सनने त्याचा त्रिफळा उडवला. मात्र बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी सांभाळून बॅटिंग करत धावा काढण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. संधी मिळेल तेव्हा मोठे फटके आणि चांगल्या चेंडूवर सावध फटके खेळत दोघांनीही चांगली भागीदारी रचली.

- Advertisement -

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईची सुरुवात अडखळत झाली होती. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने क्विंटन डिकॉकचा त्रिफळा उडवला होता. त्यानंतर इशान किशन आणि सुर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्यागीने ही जोडी तोडली. जोफ्रा आर्चरने सीमारेषेवर अफलातून कॅच पकडला. त्यानंतर एकाच षटकात श्रेयस गोपालने मुंबईच्या दोन विकेट्स काढल्या. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्या आणि सौरभ तिवारीने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. हार्दिक पांड्याने २१ चेंडूत ६० धावा काढत या मोसमातील पहिले अर्धशतक पुर्ण केले. तर पहिलीच मॅच खेळणाऱ्या सौरभ तिवारीने २५ चेंडूत ३४ धावा काढल्या. तिवारी आणि हार्दिकच्या तुफान फटकेबाजीमुळे मुंबईने २० षटकात राजस्थानसमोर १९६ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते.

- Advertisement -

रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे या सामन्यात देखील कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला खेळावे लागले होते. आजच्या पराभवामुळे मुंबईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र राजस्थानच्या विजयाने गुणतालिकेत मोठे फेरबदल झाले आहेत. प्ले ऑफच्या चौथ्या संघासाठी आता चुरस लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -