…तर आम्ही टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही

आशिया कप यजमानपदावरून पीसीबीचा बीसीसीआयला इशारा

Mumbai

यंदाची आशिया कप स्पर्धा ही पाकिस्तानात होणार होती. परंतु, बीसीसीआयचा त्याला विरोध आहे. त्यामुळे ही स्पर्धा श्रीलंका, बांगलादेश किंवा दुबई येथे खेळवण्याचा विचार आशियाई क्रिकेट संघटना करत आहे. त्यामुळे नाराज झालेल्या पीसीबीने टीम इंडियाला इशारा दिला आहे.पीसीबीचे मुख्य कार्यकारी वासीम खान यांनी ‘जर टीम इंडियाने आशिया कपमधू माघार घेतली, तर आम्ही 2021मध्ये भारतात होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमधून माघार घेऊ, असा इशारा दिला आहे. ‘आशिया क्रिकेट परिषदेने आम्हाला यंदाच्या आशिया कपचे यजमानपद दिले आहे. त्यासाठी आम्ही दोन स्टेडियम्सही निवडले आहेत. पण, जर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर आम्ही 2021च्या भारतात होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेऊ ’असे त्यांनी म्हटले आहे. तसेच आशिया कप स्पर्धेचे यजमानपद गमावल्याच्या वृत्ताचे खंडन देखील पीसीबीने केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध नेहमी तणावाचे राहिलेले आहेत. त्यात पाकिस्तानातून दहशतवादी कृत्यांना मिळणारे खतपाणी, यामुळे ते तणाव आणखी वाढलेले आहेत. त्यामुळे उभय देशांमध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिका झालेला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आणि आशिया कप स्पर्धांमध्येच हे संघ एकमेकांना भिडतात. पण, यंदाच्या आशिया कप स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते आणि भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला आहे.त्यामुळे पाकिस्तानकडून हे यजमानपद हिसकावले जाऊ शकते.