सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा सर्वोत्कृष्ट – वॉर्न 

वॉर्नने सचिन आणि लारा यांच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.   

शेन वॉर्न, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराची स्तुती केली आहे. वॉर्नने सचिन आणि लारा यांच्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना त्याखाली ‘दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज’ असे लिहिले. ‘मी ज्या फलंदाजांसोबत किंवा ज्या फलंदाजांविरुद्ध खेळलो, त्यात सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज होते. तसेच हे दोघे माझ्या काळातील (१९८९-२०१३) सर्वोत्कृष्ट फलंदाज होते. तुम्हाला आमच्यातील झुंज पाहताना मजा यायची का?’ असा प्रश्नही वॉर्नने चाहत्यांना विचारला.

सचिन आणि लारा यांची क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. सचिनने १९८९ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून १०० शतके झळकावली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक सामने असे असंख्य विक्रम सचिनच्या नावे आहेत. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात द्विशतक करणारा सचिन पहिलाच फलंदाज होता. दुसरीकडे डावखुरा लारा कसोटीच्या एका डावात ४०० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने १३१ कसोटी आणि २९९ एकदिवसीय सामन्यांत विंडीजचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे ११,९५३ आणि १०,४०५ धावा फटकावल्या. तर शेन वॉर्न हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू मानला जातो. त्याने १४५ कसोटीत ७०८ गडी बाद केले होते.