घरक्रीडाइंग्लंडमध्ये कॅरेबियन तडका लावण्यास विंडीज तयार

इंग्लंडमध्ये कॅरेबियन तडका लावण्यास विंडीज तयार

Subscribe

१९७०, ८० च्या काळात वेस्ट इंडिज हा संघ जगातील सर्वात बलाढ्य संघ म्हणून ओळखला जायचा. या संघाने १९७५ आणि १९७९ साली झालेले पहिले दोन विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता, तर १९८३ साली त्यांनी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यानंतर वेस्ट इंडिजने केवळ एकदाच उपांत्य फेरीचा टप्पा गाठला आहे. मागील २ दशकांत वेस्ट इंडिज क्रिकेट संघ आणि बोर्डाने बरेच चढ-उतार पाहिले आहेत. खेळाडू आणि अधिकारी यांच्यातील वाद, खेळाडूंना मिळत असलेला कमी पगार यामुळे बर्‍याच खेळाडूंनी या संघातून खेळण्यापेक्षा विविध देशांत होणार्‍या टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्याला पसंती दिली. त्यामुळे या संघाची कामगिरी अत्यंत निराशजनक होती.

मात्र, मागील काही दीड-दोन वर्षांत या संघाने जेसन होल्डरच्या नेतृत्त्वात आपल्या खेळात सुधारणा केल्याचे पहायला मिळत आहे. तसेच क्रिस गेल, आंद्रे रसेल, डॅरेन ब्रावो यासारख्या ताबडतोड खेळाडूंचेही या संघात पुनरागमन झाले आहे आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये होणारा आगामी विश्वचषक जिंकण्यासाठी या संघाला ‘डार्क हॉर्स’ (अपेक्षा नसतानाही जिंकू शकणारा) मानले जात आहे.

- Advertisement -

मागील (२०१५) विश्वचषकात या संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. मात्र, त्यानंतर संघात काही बदल झाले आहेत. शिमरॉन हेटमायर, शाई होप, निकोलस पूरन यासारख्या युवा खेळाडूंनी वेस्ट इंडिज क्रिकेटला नवी ऊर्जा दिली आहे. आता विश्वचषकात या युवकांच्या साथीला गेल, होल्डर, रसेल, किमार रोच असे अनुभवी खेळाडूही असणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच विस्फोटक सलामीवीर गेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहे, असे मत व्यक्त केले जात होते.

मात्र, इंग्लंडविरुद्धच्या मागील मालिकेच्या ४ सामन्यांत ४२४ धावा करत त्याने टीकाकारांची तोंड बंद केली होती. त्यातच तो या स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याने या विश्वचषकात काही खास कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक असणार. तसेच आंद्रे रसेलने नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. या २ मॅचविनर खेळाडूंच्या समावेशामुळे हा संघ खूप मजबूत झाला आहे. या विश्वचषकात वेस्ट इंडिजला थेट प्रवेश मिळाला नव्हता. त्यांना यासाठी झिम्बाब्वेमध्ये झालेल्या पात्रता फेरीत खेळावे लागले होते. त्यात चांगली कामगिरी करून हा संघ विश्वचषकासाठी पात्र झाला आहे आणि आता या विश्वचषकात हा संघ कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

जमेची बाजू – वेस्ट इंडिजच्या संघात क्रिस गेल, इव्हन लुईस, आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर हे काही असे खेळाडू आहेत, जे या संघाला एकहाती सामना जिंकवून देण्यात सक्षम आहेत. शाई होप हा मागील काही काळात या संघातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून पुढे आला आहे आणि तो विश्वचषकातही सातत्यपूर्ण कामगिरी करेल, अशी वेस्ट इंडिजला आशा असेल. तसेच जेसन होल्डरने मागील विश्वचषकातही या संघाचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळे या अनुभवाचा त्याला या स्पर्धेत फायदा होईल. किमार रोच आणि शॅनन गेब्रियलच्या रूपात वेस्ट इंडिजकडे दोन चांगले वेगवान गोलंदाज आहेत, जे सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेऊन प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत टाकू शकतील.

कमकुवत बाजू – वेस्ट इंडिज संघ आपल्या दिवशी कोणत्याही संघाचा पराभव करू शकत असला, तरी या संघाच्या कामगिरीत सातत्य नाही. मागील विश्वचषकानंतर त्यांनी चांगले प्रदर्शन केले असले तरी त्यांना एकही एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. या संघात अ‍ॅशली नर्स आणि फॅबियन अ‍ॅलन या दोन फिरकीपटूंची निवड झाली आहे, पण ते इंग्लंडच्या वातावरणात किती यशस्वी होतील याबाबत साशंकता आहे.

विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघ : जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, आंद्रे रसेल, शेल्डन कॉटरल, शॅनन गेब्रियल, किमार रोच, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), अ‍ॅशले नर्स, फॅबियन अ‍ॅलन, शिमरॉन हेटमायर, शाई होप (यष्टीरक्षक), ओशेन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, इव्हन लुईस

(खेळाडूवर लक्ष) –
क्रिस गेल [फलंदाज]
एकदिवसीय सामने : २८८
धावा : १०१५१
सरासरी : ३८.०२
स्ट्राईक रेट : ८७.१४
सर्वोत्तम : २१५

विश्वविजेते – २ वेळा (१९७५, १९७९)

-(संकलन – अन्वय सावंत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -