Coronavirus: ही वेळ हिंदू, मुस्लिम करण्याची नाही! – अख्तर

करोना हे जागतिक संकट असल्याचं शोएब अख्तर म्हणाला.

Karachi
shoaib akhtar
ही वेळ हिंदू, मुस्लिम करण्याची नाही! - अख्तर

करोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जगावरच करोनाचा परिणाम झाला आहे. यावर मात करण्यासाठी आपण हिंदू, मुस्लिम भेद न करता एकत्र येण्याची गरज आहे, असे विधान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केले. त्याचप्रमाणे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असेही आवाहन त्याने चाहत्यांना केले आहे.

करोना हे जागतिक संकट

करोनाकडे आपण जागतिक संकट म्हणून पाहणे गरजेचे आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन होत आहे. तुम्ही इतरांना भेटत राहणे योग्य नाही. लोकांचा रोजगार गेला. दुकानांमध्ये गर्दी नाही. त्यामुळे आपण या लोकांचा विचार केला पाहिजे. आता हिंदू, मुस्लिम करण्याची वेळ नाही, तर माणूस म्हणून एकत्र येण्याची वेळ आहे. आपण इतरांना मदत केली पाहिजे. श्रीमंत लोकांवर सध्याच्या परिस्थितीचा फारसा परिणाम होणार नाही. परंतु, गरिबांचे काय? ते कसे जगणार? त्यामुळे माणूस म्हणून विचार करा, असे अख्तर आपल्या युट्युबवरील व्हिडीओत म्हणाला.

प्राणी, पक्षी खाण्याची गरजच काय?

करोना विषाणू जगभरात पसरण्याला चीन जबाबदार असल्याचे अख्तर याआधी म्हणाला होता. तुम्ही वटवाघूळ, कुत्रा वैगरे कसे खाऊ शकता? तुम्हाला मुळात प्राणी, पक्षी खाण्याची गरज काय? मी चिनी लोकांबद्दल बोलत आहे. त्यांच्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. मी चिनी लोकांच्या विरोधात नाही. परंतु, प्राणी, पक्षी खाणे चुकीचे आहे आणि मला त्याचाच राग आला आहे, असे अख्तरने नमूद केले.