करून दाखवले!

- विजय मर्चंट करंडक विजेत्या मुंबईचे प्रशिक्षक दिनेश लाड

Mumbai

मुंबईच्या संघाने नुकतेच विजय मर्चंट करंडक (१६ वर्षांखालील) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. स्थानिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईला या स्पर्धेत मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. विजय मर्चंट करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया मुंबईने केवळ तिसर्‍यांदा केली. युवा संघाच्या या यशात प्रशिक्षक दिनेश लाड यांचा मोलाचा वाटा होता. मुंबईच्या १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याची ही लाड यांची पहिलीच खेप! पदार्पणातच त्यांचा संघ अजिंक्य ठरला. भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा, तसेच शार्दूल ठाकूरची कारकीर्द घडली ती लाड सरांच्या मार्गदर्शनाखाली. मुंबई क्रिकेटमधील सर्वोत्तम प्रशिक्षकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. युवा मुंबई क्रिकेटपटूंवर क्रिकेटचे संस्कार घडवण्यात लाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या सहा खेळाडूंचा विजय मर्चंट करंडक विजेत्या मुंबई संघात समावेश होता. दिनेश लाड यांनी विजेत्या संघाबद्दल आपलं महानगरशी खास बातचीत केली.

तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या १२ वर्षांखालील संघाला मी मार्गदर्शन केले होते. त्या संघातील सहा खेळाडू यंदाच्या १६ वर्षांखालील अजिंक्य संघात होते. दिलीप वेंगसरकरांनी (एमसीएच्या क्रिकेट सुधारणा समितीचे तत्कालीन अध्यक्ष) सुरुवातीला १२ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्याबाबत मला विचारणा केली. मात्र, मी १६ वर्षांखालील संघाला प्रशिक्षण देण्याची इच्छा प्रदर्शित केली. मी त्यांना म्हणालो, मला मुख्यतः १६ वर्षांखालील संघाला प्रशिक्षण द्यायचे आहे. वेळप्रसंगी दोन्ही संघांना मार्गदर्शन करण्याची माझी तयारी आहे. कर्णधार आयुष जेठवा, वेदांत गडिया, अनुराग सिंग, राज देशमुख, आदित्य रावत, यष्टीरक्षक आर्य चौकीदार, रोनीत ठाकूर, आयुष वर्तक या खेळाडूंना मी आधी मार्गदर्शन केले होते. प्रिन्स बदियानी, मुशीर खान यांचाही खेळ मी पाहिला होता. या खेळाडूंची गुणवत्ता मला ठाऊक होती. त्यामुळे या संघाला जिंकवून देणार, असे मी वेंगसरकारांना म्हणालो. जे सांगितले, ते करुन दाखवले. मात्र, हे यश माझे नाही, तर माझ्या खेळाडूंचे आहे. त्यांच्या कामगिरीमुळेच आम्ही ही स्पर्धा जिंकलो, याचा लाड यांनी आवर्जून उल्लेख केला.

विजय मर्चंट स्पर्धेत मुंबईचा पश्चिम विभागात समावेश होता. या विभागात मुंबईला गुजरात, बडोदा, सौराष्ट्र, महाराष्ट्र या संघांचा सामना करावा लागला. बडोद्याविरुद्ध मुंबईचा खेळ नीट वठला नाही. मुंबईने महाराष्ट्रावर डावाने विजय संपादला. गुजरात आणि सौराष्ट्रला पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबईने हरवले. उपांत्यपूर्व फेरीत मुंबईने आंध्रला, उपांत्य फेरीत हैदराबादला पराभूत केले. तर अंतिम फेरीत पंजाबला डावाचा मारा देत मोठ्या रुबाबात विजय मर्चंट करंडकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेताना लाड म्हणाले, आमच्या संघाची या स्पर्धेतील कामगिरी अप्रतिम होती. खासकरून, गोलंदाजांमुळे या स्पर्धेत आम्ही यश संपादले. प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यावर गोलंदाजांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला यशोशिखरावर नेले.

कर्णधार आयुष जेठवाचे कौतुक करताना लाड यांनी सांगितले, त्याला सुरुवातीला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना धावांसाठी झुंजावे लागले. त्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावर खेळण्याची चाल आम्ही खेळलो आणि ती विलक्षण यशस्वी ठरली.

मागील वर्षी आक्षेपार्ह वर्तनामुळे डावखुरा फिरकीपटू मुशीर खानवर एमसीएकडून तीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, यावर्षी ऑक्टोबरमध्ये त्याच्यावरील बंदी उठवली. त्यानंतर विजय मर्चंट करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघात त्याचा समावेश करण्यात आला. स्पर्धेच्या चार सामन्यांत त्याने ३० मोहरे टिपले. त्यापैकी दहा तर पंजाबविरुद्धच्या अंतिम लढतीत! मुशीरच्या समावेशामुळे मुंबई संघ अधिक भक्कम झाला असे लाड यांनी नमूद केले. मुशीरच्या समावेशासाठी मी, तसेच निवड समिती सदस्य उत्सुक होतो. त्यानेही आमचा विश्वास सार्थ ठरवत उत्तम कामगिरी केली. त्याच्या समावेशामुळे आमचा संघ भक्कम झाला. अर्थात त्याच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याने आमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, असे लाड यांनी सांगितले.

विजय मर्चंट करंडक स्पर्धेचे साखळी सामने ऑक्टोबरमध्ये झाले. यादरम्यान पावसाने सतत व्यत्यय आणला. मात्र, विपरीत परिस्थितीतही वानखेडेचे क्युरेटर रमेश म्हामुणकर आणि त्यांचे सहकारी, तसेच कांदिवलीच्या सचिन तेंडुलकर जिमखान्याचे क्युरेटर मधू बोटले यांच्या मेहनतीमुळे हे सामने पार पडले, याचा लाड यांनी आवर्जून उल्लेख केला.

पालकांचा हस्तक्षेप नको!

प्रशिक्षक मुलांना क्रिकेटचे धडे देत असताना पालकांनी हस्तक्षेप करता कामा नये, अशी प्रशिक्षक लाड यांची धारणा आहे. बहुतांशी प्रशिक्षक खेळाडूंच्या चुकांकडे कानाडोळा करतात. पालकांसमोर गुलाबी चित्र निर्माण केले जाते. या सापळ्यात मुलासह पालकही अडकतात. आणखी एक खटकणारी बाब म्हणजे, पालकांचा अतिरिक्त हस्तक्षेप. प्रशिक्षक आणि पालक यांच्या सल्ल्यामुळे मुलगा गोंधळून जातो. वैयक्तिक प्रशिक्षक ही बाब स्वागतार्ह. परंतु, पालकांच्या हस्तक्षेपामुळे क्रिकेट पिछाडीवर पडत आहे, असे रोखठोक मत लाड यांनी व्यक्त केले.