IPL 2020 : आम्हाला रिषभ पंतची उणीव भासतेय – श्रेयस अय्यर 

पंतला दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर राहावे लागू शकेल.   

रिषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागील शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंतच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो मागील रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही आणि दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. पंतला या दुखापतीमुळे किमान एक आठवडा मैदानाबाहेर राहावे लागू शकेल, असे मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला होता. आता दिल्ली संघाला पंतची उणीव भासत असल्याचे अय्यरने सांगितले.

यष्टिरक्षण-फलंदाजी करणारा अष्टपैलू

आमच्याकडे राखीव खेळाडूंची चांगली फळी उपलब्ध आहे. या खेळाडूंमध्ये संधी मिळाल्यावर उत्तम कामगिरी करण्याची क्षमता आहे. मात्र, आम्हाला पंतची उणीव नक्कीच भासत आहे. तो यष्टिरक्षण-फलंदाजी करणारा अष्टपैलू आहे. परंतु, आमच्या संघात असे अन्यही खेळाडू आहेत, जे त्याच्या जागी खेळून संघासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतात, असे अय्यर म्हणाला. बुधवारीच दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये सामना झाला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्याआधी पंत फिटनेस चाचणी देताना दिसला.

दिल्लीच्या खेळाडूंना दुखापतींनी सतावले 

दिल्लीच्या संघाने यंदाच्या मोसमात अप्रतिम कामगिरी केली असून त्यांना आतापर्यंत आठपैकी सहा सामने जिंकण्यात यश आले आहे. मात्र, या संघाला दुखापतींनी सतावले आहे. अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राला हाताच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले, तर वेगवान गोलंदाज ईशांत शर्माही दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यातच कर्णधार अय्यरही आता जायबंदी झाला आहे.