घरक्रीडादोन उपांत्य झुंजी

दोन उपांत्य झुंजी

Subscribe

बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत-न्यूझीलंड, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया या लढती अनुक्रमे मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड आणि बर्मिंगहॅम एजबॅस्टन येथे खेळल्या जातील. ४० दिवसांत ४१ सामने पार पडले, तर ४ सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. अपेक्षेनुसार अव्वल ४ संघांनी उपांत्य फेरी गाठली असून यंदा वर्ल्डकप स्पर्धेत नवा विजेता बघायला मिळेल का, याचे उत्तर लॉर्ड्सवर १४ जुलै रोजी मिळेल.

विराट कोहलीच्या भारतीय संघाने ९ सामन्यांतून १५ गुणांची कमाई करुन अव्वल क्रमांक पटकावला. रोहित शर्माने पाच शतकांसह ६४७ धावा फटकावल्या. रोहितला लोकेश राहुलची छान साथ लाभल्यामुळे या बिनीच्या जोडीने भारताला भक्कम पायाभरणी करुन दिली. कर्णधार कोहलीला शतकाने हुलकावणी दिली असली तरी ५ अर्धशतके त्याच्या खात्यात जमा आहेत. बाद फेरीत विराट कोहली शतक झळकावतो का, याची उत्सुकता सार्‍यांना आहे. अव्वल तीन फलंदाजांच्या सातत्यपूर्ण खेळामुळे भारताच्या मधल्या फळीचे अपयश झाकले जात आहे. बाद फेरीत अशी ढिलाई परवडण्यासारखी नाही. शिखर धवन, विजय शंकर यांच्या दुखापतींमुळे रिषभ पंत, मयांक अगरवाल यांची निवड करण्यात आली. पंतला काही सामन्यांत संधी मिळाली, पण त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. मयांक अगरवाल पॅसेंजर ठरण्याचीच शक्यता दिसते.

- Advertisement -

जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांनी आपली कामगिरी चोख बजावली असून शमीचा स्ट्राईक रेट चांगला आहे. ४ सामन्यांत त्याचा स्ट्राईक रेट आहे १५.०७, त्याने हॅटट्रिकही नोंदवली. जसप्रीत बुमराच्या भेदक, अचूक मार्‍याने प्रतिस्पर्ध्यांची कोंडी केली असून कर्णधार कोहलीचा तो हुकुमाचा एक्का आहे. कुलदीप यादव, युजवेंद्र चहल या फिरकी जोडगोळीला अपेक्षित यश लाभलेले नाही. इंग्लंडविरुद्ध त्यांच्या २० षटकांत १६० धावा फटकावल्या गेल्या. भारताने केवळ एकच सामना गमावला तो इंग्लंडविरुद्ध. रविंद्र जाडेजाच्या डावखुर्‍या फिरकीला उपांत्य लढतीत संधी मिळते का याची उत्सकता सार्‍यांना आहे. पावसामुळे न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा साखळी सामना रद्द झाला. उपांत्य फेरीत केन विल्यमसनच्या न्यूझीलंडशी भारताची गाठ पडेल ओल्ड ट्रॅफर्डवर.

साखळीत श्रीलंका, अफगाणिस्तान, विंडीज, बांगलादेश या संघांवर विजय मिळविणार्‍या किवीजना पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्याकडून सलग ३ पराभवांना सामोरे जावे लागले. प्रबळ संघांविरुध्द किवीजना आपली छाप पाडता आलेली नाही. फलंदाजीत विल्यमसनवर त्यांची मदार असते. गप्टिल, मुनरो, लॅथम, निशम तसेच भरवशाचा रॉस टेलरलाही फलंदाजीत सूर गवसलेला नाही. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, निशम यांनी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली असून बोल्टने हॅटट्रिकही नोंदवली. न्यूझीलंडतर्फे यंदा सर्वाधिक १७ बळी मिळवणारा फर्ग्युसन दुखापतीतून सावरेल अशी विल्यमसनसह, किवीजच्या चाहत्यांना आशा आहे. ४ वर्षांपूर्वी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत मुसंडी मारणार्‍या न्यूझीलंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांच्यासमोर विराट कोहलीचा भारतीय संघाचे मोठे आव्हान आहे.

- Advertisement -

यजमान इंग्लंडने वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठली ती प्रामुख्याने भारतावरील विजयामुळे! कोहलीच्या भारतीय संघाला इंग्लंडचे त्रिशतकी आव्हान पेलवले नाही. पारंपारिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया तसेच पाकिस्तान, श्रीलंका या आशियाई संघाकडून इंग्लंडला पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांच्यातील झुंज गुरुवार ११ जुलै रोजी रंगेल. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाला सामोरे जावे लागले आणि अव्वल स्थानाऐवजी भारतापाठोपाठ त्यांना दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कर्णधार फिंच, वॉर्नर, स्मिथ, कॅरी, उस्मान ख्वाजा, मॅक्सवेल अशी फलंदाजांची भक्कम फळी असतानाही त्यांची फलंदाजी मोक्याच्या क्षणी ढेपाळते. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, बेहरनडॉर्फ या तेज त्रिकुटासह झॅम्पा, लायन तसेच स्मिथ, मॅक्सवेलच्या कामचलाऊ फिरकीवर कर्णधार फिंचची भिस्त असेल. ऑस्ट्रेलियाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. शॉन मार्शऐवजी हँड्सकॉम्बची निवड करण्यात आली. ख्वाजादेखील दुखापतग्रस्त असून गुरुवारी होणार्‍या उपांत्य लढतीआधी तो फिट होईल अशी आशा आहे.

यजमान इंग्लंडला वर्ल्डकप जेतेपदाची आशा असून उपांत्य फेरीत त्यांना अ‍ॅास्ट्रेलियाशी झुंज द्यावी लागेल. वर्ल्डकपनंतर अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात होत असून त्याची झलक एजबॅस्टनवरच पाहायला मिळेल. वोक्स, आर्चर, वूड, स्टोक्स, मोईन अली, आदिल रशीद अशी विविधता इंग्लंडच्या आक्रमणात आहे. त्यांना कितपत यश लाभते ते बघायचे. जेसन रॉय, बेअरस्टो, जो रुट, मॉर्गन, स्टोक्स, बटलर अशी फलंदाजांची पलटण इंग्लंडकडे मौजूद असून स्टार्क-कमिन्स या अ‍ॅास्ट्रेलियन तेज दुकलीचा इंग्लंडचे फलंदाज कसा सामना करतात यावर इंग्लंडची आगेकूच अवलंबून राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -